धाराशिव – मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशाची तत्काळ अंमलबजावणी करण्यासाठी मराठायोध्दा मनोज जरांगे पाटील यांचे सातव्या दिवशीही उपोषण सुरू होते. त्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदच्या तिसर्‍या दिवशीही जिल्हाभरात कडकडीत बंद होता. दरम्यान बंद असतानाही वाहतूक होत असल्याने संतप्त मराठा युवकांनी उमरगा तालुक्यात बस पेटविणे, कळंब तालुक्यात भर रस्त्यात टायर पेटवून आपला संताप व्यक्त केला. तर धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दुसर्‍या दिवशीही १५ बैलगाड्या, ट्रॅक्टरसह मराठा समाजबांधव ठिय्या मांडून होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुरूवारी सांजा येथील १८ बैलगाड्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठाण मांडून असलेल्या बैलगाड्या दुसर्‍या दिवशीही तिथेच होत्या. पाणी-वैरणीच्या सोयीसह आलेल्या मराठा समाजातील शेतकर्‍यांनी प्रमुख मार्गावर बैलगाड्या सोडून, मुख्य रस्त्यावर आंदोलन केले. ‘मराठा आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे’, ‘एक मराठा, लाख मराठा’, अशा घोषणांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक दणाणून गेला होता.

हेही वाचा – अजित पवार का म्हणाले, “…तर राजकारणातील माझी किंमत कमी होईल”

कळंबमध्ये बसवर दगडफेक

कळंब : आरक्षणासाठी आंदोलनकर्ते मनोज जरांगे-पाटील यांची प्रकृती खालावल्याने कळंब तालुक्यात आरक्षणाचे आंदोलन पेटले होते. लातूर-कळंब मार्गावर लातूर आगाराच्या बसवर दगडफेक करण्यात आली. शुक्रवारी विविध मार्गावरील बसफेर्‍या बंद करण्यात आल्याने आगारात शुकशुकाट निर्माण झाला होता.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज सकल मराठा समाजाच्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात आले. त्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाल्याचे पहावयास मिळाले. तालुक्यातील देवळाली येथील शेकडो समाजबांधवांनी कळंब-ढोकी मार्गावर रास्ता रोको करून शासनाचा निषेध केला. तालुक्यातील हावरगाव येथे रस्तत्यावर झाडी तोडून टाकण्यात आली. यामुळे चार तास या हासेगाव – इटकूर पारा मार्गावरची वाहतूक विस्कळित झाली होती. लातूर-कळंब-भाटसांगवी मार्गावर खोंदला, सत्रा परिसरातील मराठा समाज एकत्र येत खोंदला पाटीवर टायर जाळून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. तालूक्यातील मोहा येथे शेकडो समाज बांधवांनी घोषणा देत चक्का जाम आंदोलन केले. यामुळे प्रशासकीय यंत्रणेची चांगलीच भंबेरी उडाली होती.

हेही वाचा – सोलापुरात ‘औद्योगिक बंद’ला संमिश्र प्रतिसाद

तुरोरीनजीक उड्डाणपुलावर बस पेटवली

उमरगा : तालुक्यातील तुरोरीनजीकच्या उड्डाणपुलावर दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान अज्ञात व्यक्तींनी उमरगा आगाराची बस पेटवून दिली. यात बस जळून खाक झाली. या बसमध्ये २८ प्रवासी होते. सर्वांना खाली उतरवून बस पेटवून देण्यात आली. यात कसलीही जीवितहानी झाली नाही. मात्र बसचे मोठे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी सदाशिव शेलार, आगारप्रमुख यांनी घटनास्थळी भेट दिली. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. वास्तविक मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उमरगा आगारातून बससेवा ही बंद होती. मात्र वरिष्ठ अधिकर्‍याने ही बस सोडण्याचे आदेश दिल्याची चर्चा दिसून येत होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In dharashiv district the maratha reservation movement intensified for the third day ssb
Show comments