धाराशिव : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठीच गावातील तरूणाने आत्महत्या केली असल्याचा दावा उमरगा तालुक्यातील माडज येथील ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे बुधवारी सायंकाळपासून उमरगा तालुक्यात तणाव निर्माण झाला होता. गुरूवारी मृतदेह घोषणाबाजी करीत उमरगा उपजिल्हा रूग्णालयात आणण्यात आला. उत्तरीय तपासणीनंतर जमाव उपविभागीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर धडकला. त्याचवेळी शासकीय विश्रामगृहासमोर दोन तरूणांनी कार पेटवून देत मराठा आरक्षणासाठी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर माडज येथे मयत तरूणावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
राज्यभर मराठा आरक्षणासाठी वेगवेगळी आंदोलने सुरू आहेत. त्यातच माडज येथील किसन माने या तीस वर्षीय तरूणाने बुधवारी गावातील शिवकालीन तलावात उडी घेवून आत्महत्या केली. मराठा समाजाच्या आरक्षणासाठीच त्याने आत्महत्या केली असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ग्रामस्थांच्या भावनांची दखल घेवून महसूल व पोलीस प्रशासनाने याबाबत वरिष्ठांपयर्ंंत माहिती पोहोचवली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीस प्रशासन माडज येथील घटनेवर लक्ष ठेवून होते. घटनेनंतर सकल मराठा समाजाकडून उमरगा शहर बंदचे आवाहन समाजमाध्यमांवर करण्यात आले. त्यामुळे गुरूवारी उमरगा शहरासह नारंंगवाडी आणि माडज या दोन्ही गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. उमरगा बस आगारातून एकही बस सोडण्यात आली नाही.
आत्महत्त्या केलेल्या तरूणाचा मृतदेह माडज येथून उमरगा शहरापर्यंत घोषणाबाजी करीत आणण्यात आला. उपजिल्हा रूग्णालयात मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, स्थानिक आमदार ज्ञानराज चौगुले, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबा पाटील, काँग्रेसचे प्रदेश सचिव दिलीप भालेराव, राष्ट्रवादी युवतीच्या सक्षणा सलगर, भाजपाचे कैलास शिंदे, किरण गायकवाड, बसवराज वरनाळे, रज्जाक अत्तार, शौकत पटेल, विनायक पाटील, अमर बिराजदार आदी विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
कार पेटवून केला निषेध
मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर आंदोलनकत्यार्र्ंनी त्यांचा मोर्चा उपविभागीय कार्यालयाकडे वळविला. मोठ्या संख्येने आंदोलक उपविभागीय कार्यालयासमोर जमा झाले. त्याचवेळी शासकीय विश्रामगृहासमोर तीन ते चार तरूणांनी मुख्य रस्त्यावर एक जुनी कार पेटवून दिली. त्यानंतर या तरूणांनी मराठा आरक्षणासाठी जोरदार घोषणाबाजी केली. थोड्या वेळानंतर उपविभागीय कार्यालयात जमा झालेली गर्दी हळुहळू पांगली आणि मृतदेह माडज येथे अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला. दरम्यान पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, उपविभागीय अधिकारी गणेश पवार, पोलीस निरीक्षक डी. बी. पारेकर, तहसीलदार गोविंद येरमे, नायब तहसीलदार राजाराम केलुरकर, पोलीस निरीक्षक रतन काजळे यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता.