धाराशिव : तालुक्यातील तेर येथील संतश्रेष्ठ गोरोबाकाकांच्या मंदिर व परिसराच्या विकास आराखड्याची कामे करून तेरला धार्मिक व पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. आमदार पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत आणखी चार कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. आजवर नव्याने एकूण १३ कोटींचा निधी उपलब्ध झाल्याने विकासकामांच्या निविदा प्रक्रियेला वेग आला आहे. तेरला मोठा ऐतिहासिक, सांस्कृतिक व धार्मिक वारसा लाभलेला आहे. तेरमध्ये अनेक प्राचीन मंदिरे आहेत. महायुती सरकार सत्तेत आल्यापासून राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागासह जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे.
हेही वाचा : “आम्ही पोळी शेकायला तयारच असतो, आम्हा राजकारण्यांची जातच…”, बच्चू कडूंच्या विधानाची चर्चा!
संतश्रेष्ठ गोरोबा काका मंदिर व परिसराचा संपूर्ण विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. उपलब्ध निधी मधून पहिल्या टप्प्यात महाद्वार, नगारखाना, संरक्षक भिंत, शौचालय, दर्शनबारी, भक्त निवासाचे उर्वरित काम, छोट्या व्यावसायिकांसाठी दुकाने, विद्युतीकरण ही कामे करण्यात येणार आहेत. मंदिर व परिसराच्या विकास आराखड्याबाबत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता, वास्तुविशारद नागेशकर व इतर संबंधित अधिकार्यांची बैठक घेतली.
हेही वाचा : वसई : चिखलडोंगरी गावातील ‘जात पंचायत’ अखेर बरखास्त; घेतलेल्या दंडाची रक्कम परत करण्यास सुरुवात
बैठकीत उपलब्ध निधीमधून कोणती कामे प्राधान्याने हाती घ्यावयाची? यावर चर्चा करण्यात आली. त्यामुळे आता तातडीने निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रे विकसित करून पर्यटन सर्किटच्या माध्यमातून रोजगार निर्मितीसह आर्थिक समृद्धीसाठी विशेष प्रयत्न करण्यात येत असून जिल्ह्याच्या अर्थकारणाला यामुळे नक्कीच कलाटणी मिळणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.