धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथील ड्रग्ज विक्री प्रकरणाचा छडा लावण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे. मुंबईतून संगीता वैभव भोळे या ३२ वर्षीय युवतीला मुंबई पोलिसांच्या सहकार्याने तुळजापूर येथील विशेष पोलीस पथकाने गजाआड केले आहे. तुळजापुरातील एमडी ड्रग्ज विक्री प्रकरणातील ती मुख्य सूत्रधार असल्याचे तपासात समोर आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. न्यायालयासमोर तिला हजर केले असता न्यायालयाने नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे १५ फेब्रुवारी रोजी पोलिसांना एमडी ड्रग्जचा मोठा साठा छापा मारून पकडला होता. तीन महिन्यांपासून पोलीस ड्रग्ज विक्री प्रकरणाचे धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न करत होते. यापूर्वी दोन वेळा ड्रज विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्याचा त्यांनी प्रयत्न केला मात्र दोन्ही वेळा आरोपींना सुगावा लागल्यामुळे मुद्देमालासह आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले नाही. १५ फेब्रुवारी रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा लावला आणि तुळजापूर शहरासह परिसरात एमडी ड्रग्ज विक्रीचा नंगानाच करणाऱ्या टोळीला मुद्देमालासह गजाआड करण्यात तुळजापूर पोलिसांना यश आले. यावेळी पोलिसांनी अडीच लाख रुपये किमतीच्या ५९ ड्रग्जच्या पुड्या आरोपींकडून हस्तगत केल्या. त्यानंतर तुळजापूर शहर आणि परिसरात एकच गोंधळ माजला होता. पोलिसांवर आरोपींना पाठीशी घातले जात असल्याचा आरोपही करण्यात आला. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी ७२ तासाचा अल्टिमेटम देत या प्रकरणाचे धागेदोरे शोधण्याचे निर्देश पोलीस प्रशासनाला दिले होते, तर या प्रकरणाची इत्यंभूत कारवाई आपण दिलेल्या माहितीनुसारच झाली असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले होते. विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत तुळजापूर शहर आणि परिसरातील माता-भगिनींनी ड्रग्जचा विळखा तरुणांना कशा पद्धतीने व्यसनाधीन करीत आहे याची भयावह हकीकत आपणास सांगितली होती. ही सर्व माहिती आपण पोलिसांना दिली. त्यानुसारच विशेष पथक नेमणूक पोलिसांनी ड्रग्ज विक्रीचे धागेद्वारे शोधण्यासाठी प्रयत्न सुरू केले असल्याचे आमदार पाटील यांनी म्हटले होते. आता या प्रकरणात मुंबईतून संगीता गोळे या युवतीला अटक करण्यात आली आहे. तिला नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ड्रग्ज विक्री प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेली संगीता गोळी ही सध्या मुंबई येथे वास्तव्यास असली तरी सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात तिचे मूळ गाव आहे. संगीता गोळे हिचा पती आणि दीर या दोघांवरही एनडीपीएस कायद्याअंतर्गत यापूर्वी गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले. १५ फेब्रुवारी रोजी एमडी ड्रग्जसह सापडलेल्या आरोपींची कसून तपासणी करण्यात आल्यानंतर संगीता गोळे तिचे नाव निष्पन्न झाले. मुंबई पोलिसांच्या मदतीने तिला गजाआड करण्यात आले आहे. यापूर्वी पुणे येथे एकदा तिला अटक करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांना गुंगारा देण्यात ती यशस्वी झाली होती. दुसऱ्या वेळी मुंबई पोलिसांनी केलेल्या सहकार्यामुळे तुळजापूर शहर आणि परिसरात ड्रग्जविक्री करणाऱ्या टोळीची मुख्य सूत्रधार संगीता वैभव गोळे हिला अटक करण्यात तुळजापूर पोलिसांना यश आले आहे. आता यात आणखी कोण स्थानिक आरोपी सहभागी आहेत हे संगीता गोळे हिच्या अटकेमुळे समोर येणार आहे.