चिपळूण : कोकणातील चिपळूण, महाड ही शहरे पावसाळ्यात हमखास पुराच्या तडाख्यात सापडतात. तेथील जनजीवन अस्ताव्यस्त होते; परंतु अशा आपत्तीतून धडा घेऊन काही संवेदनशील उच्चपदस्थ सामाजिक बांधिलकीतून अधिक काही करतात. चिपळूणमधील लेखापरीक्षक निशा आंबेकर-कुलकर्णी या अशा लोकांपैकीच एक.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चिपळूणमध्ये येणाऱ्या महापुराचा सामना करण्यासाठी आपणही सज्ज असले पाहिजे, या भावनेतून निशा आंबेकर यांनी यांत्रिक नौका चालवण्याचे कौशल्य आत्मसात केले आहे. चिपळूण नगर परिषदेने पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी आयोजित केलेल्या आपत्ती व्यवस्थापनाच्या प्रशिक्षणामध्ये त्या सहभागी झाल्या होत्या.

गेल्या वर्षी जुलैमध्ये चिपळूण शहराला महापुराचा तडाखा बसला. जीवितहानी टळली, परंतु स्थानिक व्यापारी-उद्योजकांसह सर्वसामान्यांचे एकत्रित कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. या संकटापासून धडा घेत चिपळूण नगर परिषदेने प्रतिबंधात्मक उपाययोजनांची आखणी आणि प्रशिक्षण मोहीम गेल्या महिन्यात हाती घेतली. तसेच पूरपरिस्थितीला तोंड देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला. नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी आणि स्वयंसेवक मिळून १७ जणांना वाशिष्ठी खाडीत नौका चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यामध्ये शहरातील लेखापरीक्षक निशा आंबेकर-कुलकर्णी यांचा सहभाग लक्षवेधी ठरला. त्यांनी यांत्रिकी नौका चालवण्याबरोबरच पाण्यात बुडणाऱ्याला बाहेर काढून प्रथमोपचार करणे, ड्रोनचा वापर, सुरक्षाविषयक उपाय इत्यादीचे प्रशिक्षण घेतले.

या सहभागाबद्दल आंबेकर म्हणाल्या की, गेल्या वर्षीच्या महापुरात माझे घर आणि तळमजल्यावरील कार्यालयाचे मिळून सुमारे ३०-३५ लाख रुपयांचे नुकसान झाले. काहीही वाचवता आले नाही. सरकारी मदतही मिळाली नाही. अशा प्रकारे महापुराच्या काळात कोणावर आपत्ती येईल, हे सांगता येत नाही, याची जाणीव तीव्रतेने झाली. म्हणून आपण महापुराचा सामना करण्यासाठी सज्ज असले पाहिजे. पालिका प्रशिक्षण देत असेल तर आपण घेतले पाहिजे, असे मला तीव्रतेने वाटले. महाविद्यालयीन जीवनात मी ‘एनसीसी’ची कॅडेट होते. जलतरण, ॲथलेटिक्स इत्यादी खेळांमध्येही राष्ट्रीय पातळीवर प्रावीण्य मिळवले आहे. त्यामुळे येथे यांत्रिक नौका चालवण्यास पटकन शिकले. त्यामुळे संकटकाळात नौका उपलब्ध असतील आणि चालक नसेल तर मी ती जबाबदारी पार पाडू शकते. यातून शहराला संकटकाळात मदत केल्याचेही समाधान त्यातून मिळेल.

दरम्यान, गेल्या वर्षीप्रमाणे काही नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास आपदग्रस्तांना स्थलांतरित करण्यासाठी शहरातील डीबीजे महाविद्यालय, युनायटेड इंग्लिश स्कूल, पेठमाप उर्दू शाळा, प्राथमिक मराठी शाळा, गोवळकोट उर्दू शाळा इत्यादी ठिकाणी नियोजन करण्यात आले आहे. त्याशिवाय शहरातील शासकीय इमारतीही सज्ज आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In disaster management team a lady has responsibility of sailing the boat in konkan asj