लोकसत्ता प्रतिनिधी
सोलापूर: बहुप्रतिक्षेनंतर पहिल्या आगमनात झालेल्या दमदार पावसामुळे सोलापूरकर एकीकडे आनंदून गेले असताना दुसरीकडे नागरिकांची अक्षरशः त्रेधातिरपीट झाल्याचे पाहायला मिळाले. यानिमित्ताने सोलापूर महापालिकेच्या नालेसफाई कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
सोलापुरात यंदा पहिल्यांदाच पडलेल्या दमदार पावसाचा नागरिकांनी मनसोक्त आनंद लुटला. तासाभरात ६६ मिलीमीटर एवढा मोठा पाऊस झाला. त्याबद्दल समाधान वाटत असतानाच दुसरीकडे सखल भागात अनेक गोरगरिबांच्या घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले. त्यातच आसपासच्या गटारे तुडूंब भरून रस्त्यावर वाहून लागल्यामुळे तेथील जनजीवनावर परिणाम झाला.
आणखी वाचा-सातारा: साहसी खेळादरम्यान महाबळेश्वर येथे मुंबईच्या पर्यटक महिलेचा मृत्यू
महामालिकेने अनेक नैसर्गिक नाल्यांवर आर्थिक उत्पन्नाचे स्रोत वाढविण्याच्या हेतूने व्यापार संकुले उभारली आहेत. त्यामुळे बंदिस्त नाल्यांची नियमितच नव्हे तर पावसाळापूर्वही साफसफाई होत नाही. त्यापैकीच गणेश पेठ नाल्यावरील व्यापारसंकुलाच्या परिसरात नाल्यातून वाहणारे पावसाचे पाणी वाढले आणि रस्त्यावर आले. हे पाणी इतके वाढले की त्यात रस्त्याच्या कडेला थांबलेल्या अनेक दुचाकी वाहने बुडून गेल्या. ही वाहने पाण्याच्या प्रवाहात वाहून जाण्याची परिस्थिती ओढवली असता पाण्यातील दुचाकी वाहने दोरीने बांधून व्यापार संकुलातील उंचवट्या पदपथावर काढण्याची तरूणाईची धडपड सुरू होती. दुसरीकडे याच रस्त्यावर एका पेट्रोल पंपावरही पावसाचे पाणी शिरल्यामुळे तेथे गोंधळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
शनिवार पेठेतही नैसर्गिक नाला पावसाच्या पाण्यामुळे भरून वाहू लागला. नाल्यातील पाणी रस्त्यावर आले. या नाल्याच्या आसपास दाटीवाटीने घरे आसल्यामुळे आणि त्यातच अतिक्रमणेही झाल्यामुळे नाल्यातील पाणी वाढतच गेले. त्यामुळे शेवटी लगतच्या घराची भिंत फोडून पाण्याला वाट करून देण्यात आली.