सातारा : गोंदवले बुद्रुक (ता. माण) येथील तरुणाचा प्रेमसंबंधातून धारदार शस्त्राने खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दहिवडी पोलिसांनी मायलेकीला ताब्यात घेतले असून, एकूण सात जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांनी दिली.

तेजस पवार (वय ३२, रा. गोंदवले बुद्रुक, ता. माण) यांनी आपला भाऊ योगेश पवार हा दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दहिवडी पोलीस ठाण्यात दिली होती. या प्रकरणाचा दहिवडी पोलीस तपास करत असताना योगेश पवार याचा खून झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्याचा मृतदेह नातेपुतेजवळील कालव्यामध्ये गाडीमध्ये हात-पाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आला.

योगेशचे माण तालुक्यातील एका गावातील तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. दि. १८ रोजी योगेशला संबंधित तरुणीने फोन करून बोलावून घेतले. त्यानंतर तिने व तिच्या आईने, तसेच इतर साथीदारांनी प्रेमसंबंधातून, तसेच हातउसने घेतलेल्या पैशाच्या कारणावरून धारदार शस्त्राने योगेशचा खून केला. त्यानंतर त्याच्याच गाडीमध्ये त्याचा मृतदेह ठेवला आणि नातेपुतेजवळील फडतरी रस्त्यालगत असलेल्या कालव्यात टाकून दिला. हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी संबंधित मायलेकीला ताब्यात घेतले असून, इतर संशयितांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, महिला पोलीस उपनिरीक्षक चांदणी मोटे या अधिक तपास करीत आहेत.