हिंगोली : जिल्ह्यातील तीन लाख ५० हजार महिलांच्या आरोग्यविषयक तपासणीमध्ये १३ हजार ५०० महिलांमध्ये कर्करोगाची शक्यता असल्याची लक्षणे आढळून आली आहेत. जिल्ह्यात आठ मार्चपासून ‘संजीवन अभियान’ असे नाव देऊन तज्ज्ञ डॉक्टर, ‘आशा’ कार्यकर्ती मार्फत करण्यात आलेल्या महिलांच्या सर्वेक्षणातून ही बाब पुढे आली आहे.
सात हजार महिलांना गर्भाशयाच्या मुखाचा, ३५०० जणींना स्तनाचा तर दोन हजार जणींना मुख कर्करोग होण्याची शक्यता असल्याचे दिसून आले आहे. या महिलांच्या पुढील तपासण्या कराव्या लागतील असे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितले. हे अभियान जिल्हाभर नीटपणे राबविणारे जिल्हाधिकारी अभिनव गाेयल यांची आता बदली झाली आहे.
जिल्ह्यातील महिलांच्या आरोग्य तपासणीतून आढळलेल्या लक्षणांमुळे प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेमध्ये खळबळ उडाली आहे. या महिलांची पुढील तपासणी करून त्यांना कर्करोग झाला आहे का, हे तपासावे लागणार असल्याचे सांगण्यात आले. लवकर तपासणी आणि त्यावर उपचार केले तर या रोगावर मात करता येते. त्यामुळे लातूर जिल्ह्यातही असे प्रयोग पूर्वी केले होते. आता हिंगोलीमध्येही पुढील चाचण्या व बायोप्सी चाचणी मोफत केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.