जालना – एका मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नियुक्त करण्याच्या संदर्भाने आलेल्या तक्रार अर्जाचा निपटारा करण्यासाठी तब्बल ३० लाखांची मागणी करून २५ लाखांवर तडजोड ठरली. त्यातील पहिला हप्ता म्हणून पाच लाख स्वीकारताना जालना येथील दुग्ध कार्यालयातील सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था) वर्ग – २ व सहकार अधिकारी (वर्ग – ३) जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील सापळ्यात अडकले. शुक्रवारी (३ जानेवारी) सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी तालुका जालना ठाण्यात रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय अर्जुनराव आराख (वय ५४) व शेख रईस शेख जाफर (वय ४४), अशी लाच स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. संजय आराख (रा. रंगनाथनगर, इंदेवाडी) हे सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था – वर्ग – २) तर शेख रईस हा सहकार अधिकारी (श्रेणी- २, रा. छत्रपती संभाजीनगर) आहे. याप्रकरणी पन्नास वर्षीय तक्रारदाराने तक्रार दिली.
हेही वाचा – अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
तक्रारीनुसार लाच घेतलेल्या अधिकाऱ्यांकडून २७ डिसेंबर २०२४ रोजी उपरोक्त प्रकरणी ३० लाखांची मागणी करून करण्यात आली. त्यात २५ लाखांवर तडजोड करण्यात आली. या रकमेतील पहिला हप्ता म्हणून पाच लाख रुपये पंचासमक्ष स्वीकारण्याचे मान्य केले. तक्रारदाराचा मंठा तालुक्यातील दहा येथील विशाल मच्छ व्यवसाय सहकारी संस्था मर्या. या संस्थेचे संचालक मंडळ बरखास्त करून त्यावरती प्रशासक नियुक्ती करण्याबाबत जालन्यातील दुग्ध कार्यालयातील सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था) कार्यालयात तक्रार अर्ज दाखल झाला. हा तक्रार अर्ज निकाली काढून त्याचा निपटारा करण्यासाठी लाच स्वीकारण्याचे वरील दोन्ही अधिकाऱ्यांनी पंचा समक्ष मान्य केले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सापळा अधिकारी शंकर मुटेकर यांच्या पथकाने दोन्ही अधिकाऱ्यांस लाच मागताना पंचासमक्ष पकडले. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे तालुका जालना येथे गुन्हा दाखल करण्यात आला.