जालना : परतूर तालुक्यातील खांडवी आणि भोकरदनजवळच्या वालसा डावरगाव येथे आणखी दोन सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत. यापूर्वी जिल्ह्यात हिवर्डी (ता. जालना) आणि केळीगव्हाण (ता. बदनापूर) येथे सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजने’अंतर्गत या चार प्रकल्पातून जिल्ह्यातील ५७ गावांतील ५ हजार ६९२ कृषी पंपांना दिवसा वीजपुरवठा करण्यात येत आहे.
वालसा डावरगाव येथील चार मेगावॅटच्या प्रकल्पातून आठ गावांतील ९५२ कृषी पंपांना दिवसा वीजपुरवठा केला जात आहे. तर खांडवी येथील पाच मेगावॅटच्या प्रकल्पातून १३ गावांमधील १ हजार १८० कृषी पंपांना वीजपुरवठा केला जात आहे.
जिल्ह्यात सहा मेगावॅट क्षमतेचा पहिला प्रकल्प जालना तालुक्यातील हिवर्डी येथे यापूर्वीच कार्यान्वित झालेला आहे. या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज ३० गावांतील २ हजार ५७० कृषी पंपांना दिली जात आहे. तर बदनापूर तालुक्यातील केळीगव्हाण येथील पाच मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पातून सहा गावांमधील १ हजार १०० कृषी पंपांना दिवसा वीजपुरवठा करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या अंतर्गत प्रकल्प उभारणीसाठी ‘महावितरण’ उपकेंद्राच्या पाच किलोमीटर परिघातील जमिनीचा वापर करण्यात येत आहे. प्राधान्याने शासकीय जमिनीवर हे प्रकल्प उभारण्याचे धोरण आहे. यामधून निर्माण होणारी वीज ‘महावितरण’च्या उपकेंद्रातील फीडरद्वारे परिसरातील कृषी पंपांना दिली जाते.