जालना – शेतकऱ्याचे अपहरण करून २५ लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या पाच जणांना मौजपुरी पोलिसांनी अटक केली आहे. जालना तालुक्यातील धानोरा येथील शेतकरी निवृत्ती तांगडे घराच्या बाहेर झोपले असता २२ मार्च रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास पाच-सात जणांनी वाहनामध्ये टाकून त्यांचे अपहरण करून नंतर सोडून दिले होते.
गणेश तात्याराव श्रीखंडे, रामप्रसाद ऊर्फ बाळू दिगंबर शिंदे, विशाल उर्फ गजानन डोंगरे, आकाश तुकाराम रंधे (चौघेही रा. सावरगाव हडप, ता. जालना) आणि आकाश अशोक घुले (नेवासा फाटा), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर अनिकेत गोरख उकांडे (रा. अकोले नेर) आणि श्याम चव्हाण (रा. खरपुडी ता. जालना) या दोन आरोपींच्या शोधात पोलीस आहेत. अटक केलेल्या आरोपींकडून चारचाकी वाहन, मोबाईल फोन आदी ९ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटकेतील आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
यासंदर्भातील तक्रार निवृत्ती तांगडे यांनी मौजपुरी पोलिसांत दिली होती. तोंड दाबून आपणास जालना शहराच्या दिशेने घेऊन जाऊन खिशातील पंधरा हजार रुपये काढून घेतले आणि जीवे न मारता सोडून देण्यासाठी २५ लाख रुपयांची खंडणी मागितली. घाबरल्यामुळे २५ लाख रुपये देण्याचे मान्य केल्यानंतर जालना तालुक्यातील घोडेगाव फाटा येथे रात्री आणून सोडले, असे फिर्यादीत म्ह्टले आहे. २२ मार्च रोजी दुपारी चार वाजता फोनवर संपर्क करून २५ लाख रुपये दिले नाही तर कुटुंबालाही संपवून टाकू, अशी धमकी आपणास देण्यात आल्याचे तांगडे यांनी तक्रारीत नमूद केले आहे.