जालना : आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टा घेणाऱ्या आणि लावणाऱ्या चौघांविरुद्ध जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली. गुन्हे शाखेने या चौघांच्या विरोधात जालना शहरातील सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली.
आयपीएलच्या कोलकत्ता विरुद्ध राजस्थान सामन्यात दोघे जण सट्टा लावताना आणि दोघेे सट्टा घेतताना स्थानिक गुन्हे शाखेस आढळून आले होते. त्यांच्याकडून दोन मोबाईल आणि रोख ४० हजार ५० रुपये पोलिसांनी जप्त केले आहेत. अलीकडेच आयपीएल आणि अन्य क्रिकेट सामन्यांवर सट्टा घेणाऱ्या १६ जणांच्या विरुद्ध जालना पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.
गेल्या सात वर्षांतील या संदर्भातील गुन्ह्यांची माहिती घेऊन १६ जणांकडून बंधपत्र करून घेण्यात आले आहे. जालना शहरात आयपीएल आणि अन्य क्रिकेट सामन्यांवर सट्टा घेत असल्याने अनेक तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी नुकत्याच संपलेल्या विधिमंडळ अधिवेशनात सांगितले होते. याबाबत कारवाईची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली होती.