जालना : गुप्तधनाच्या लालसेपोटी एका भोंदूबाबाने पाच वर्षाच्या मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातील वालसा वडाळा येथील ज्ञानेश्वर भिका आहेर यांनी गेल्या ३ मार्च रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आपण भोंदूबाबा गणेश दामोधर लोखंडे याच्या त्रासास कंटाळून आमहत्या करीत असल्याची चिठ्ठी ज्ञानेश्वर यांच्या खिशात सापडली होती.
ज्ञानेश्वर आहेर यांच्या पत्नीच्या फिर्यादीवरून गणेश लोखंडे याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत केल्याचा गुन्हा नोंदवून भोकरदन पोलिसांनी त्याला अटक केली होती. या गुन्ह्याच्या तपासात लोखंडे याने गुप्तधनाच्या लालसेपोटी ज्ञानेश्वर आहेर यांच्या मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आहे. त्यासाठी लोखंडे याने त्याच्या बुलढाणा जिल्ह्यातील धामणगाव येथे पडक्या घरात खोल खड्डा खोदला होता.