संगमनेर : जम्मू काश्मीरमध्ये भारत-पाक नियंत्रण रेषेवर कार्यरत असलेल्या संगमनेर तालुक्यातील जवानाचा मृत्यू झाला. रामदास साहेबराव बडे असे शहीद जवानाचे नाव असून ते संगमनेर तालुक्यातील मेंढवन येथील राहणारे होते. ३४ एफ रेजिमेंट मध्ये ते हवालदार म्हणून कार्यरत होते. उद्या, बुधवारी मेंढवण येथे सरकारी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, जम्मू-काश्मीरमधील तंगधार जिल्ह्यात ऑपरेशनल ड्युटी करत असताना नियंत्रण रेषेवर बढे यांचे निधन झाले. त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला याबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही. मात्र स्थानिक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे समजते. उद्या, २६ मार्च रोजी दुपारी १ वाजता त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार होणार आहेत. अंत्यविधी प्रसंगी युद्धातील अपघातांसाठीच्या मानकांचे पालन केले जाणार आहे.
अत्यंत गरिबीच्या परिस्थिती झगडत बडे सैन्य दलात दाखल झाले होते. त्यांच्या मृत्यूने मेंढवनसह संगमनेर तालुक्यात शोक व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.