साऱ्या महाराष्ट्राचा कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या सोमवती अमावस्या यात्रेस सुमारे दोन लाख भाविकांनी गर्दी केली होती. राज्यात सुरू असलेल्या मुलांच्या शालेय परीक्षा मंगळवारी आलेला पाडवा सण व कडक उन्हाचा यात्रेवर परिणाम जाणवला. अपेक्षे एवढे भाविक जेजुरीत यात्रेला आले नाहीत. खंडोबा गडावर पहाटे साडेतीन पासून देवदर्शनासाठी भाविकांची दुहेरी रांग लागली. उन्हाचा त्रास टाळण्यासाठी अनेक भाविक सकाळीच गडावर आले.दुपारी एक वाजता मुख्य इनामदार राजेंद्र पेशवे व सचिन पेशवे यांनी सूचना केल्यावर खांदेकर्‍यांनी पालखी उचलून खांद्यावर घेतली यावेळी घडशी समाजाने सनई चौघडा ढोल ताशा आदि पारंपारिक वाद्यांचा गजर सुरू केला . बंदुकीच्या पाच फैरी झाडून पालखी सोहळ्याला सलामी देण्यात आली. यावेळी खंडोबा देवस्थानचे मुख्य विश्वस्त अनिल सौंदडे, विश्वस्त ऍड .विश्वास पानसे,ऍड पांडुरंग थोरवे, पोपट खोमणे, राजेंद्र खेडेकर ,मंगेश घोणे, अभिजीत देवकाते आदि उपस्थित होते .

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सनई- ढोल ताशाच्या निनादामध्ये पालखीने मंदिराला प्रदक्षिणा घातली. पालखी नवरात्र महालामध्ये आणून ठेवण्यात आली. तेथे गुरव समाजाने पारंपारिक पद्धतीने पालखीत खंडोबा म्हाळसादेवीच्या उत्सव मूर्ती ठेवल्यावर देवांची पालखी करा स्नानासाठी निघाली उपस्थित असलेल्या हजारो भाविकांनी सदानंदाचा येळकोट, येळकोट -येळकोट जय मल्हार असा जयघोष करीत पालखीवर भंडाऱ्याची मुक्त उधळण केली. खंडोबाचा ऐतिहासिक गड पिवळा धमक झाला. गडावर प्रचंड ऊन असल्याने साऱ्यांच्या अंगातून घामाच्या धारा सुरू होत्या पाय भाजत होते मात्र कशाचीही पर्वा न करता मानकरी -खांदेकरी उत्साहाने पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते. साऱ्या भाविकांच्या भरती प्रेमाला उधाण आले होते. भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती पालखी सोहळा होळकरांच्या छत्री मंदिराला भेटल्यानंतर कऱ्हा नदीकडे स्नानासाठी मार्गस्थ झाला. पालखीच्या अग्रभागी देवाचा मानाचा अश्व होता.

हेही वाचा : “वर्गणी काढून मला घर बांधून द्या, मी मरेपर्यंत…”, पंकजा मुंडेंचं कार्यकर्त्यांना आवाहन

सायंकाळी साडेपाच वाजता कऱ्हा नदीवरील रंभाई शिंपीण मंदिराजवळ असलेल्या कुंडामध्ये देवांच्या उत्सव मूर्तींना धार्मिक वातावरणामध्ये स्नान घालण्यात आले. यावेळी सारा परिसर सदानंदाचा येळकोट अशा गजराने दुमदुमून गेला. उपस्थित भाविकांनी स्नान करून पर्वणीचा आनंद घेतला. जेजुरी नगरपालिका व खंडोबा देवस्थान भाविकांना पिण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध करून दिले मनसेचे शहराध्यक्ष उमेश जगताप यांनी शिवाजी चौकामध्ये भाविकांना पिण्यासाठी थंड पाणी दिले. यात्रेमध्ये भंडार -खोबरे,दिवटी बुधली, देवांचे फोटो, टाक,दवणा याला मागणी जास्त होती. कडेपठारच्या डोंगरातील खंडोबाच्या मूळ मंदिरातही हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. खांदेकऱ्यांचे पाय भाजू नयेत यासाठी देवस्थाने पंधराशे पायमोजे व टोप्या वितरित केल्या होत्या.

हेही वाचा : “जे कधीच राहिले नाही कुणाचे मिंधे, म्हणून येथे आले एकनाथ शिंदे”; रामदास आठवलेंनी शेरोशायरीने गाजवली मोदींची सभा

करेच्या पात्रात पाणी नसल्याने पर्यायी व्यवस्था

करा नदीच्या पात्रामध्ये पाणी उपलब्ध नसल्याने पात्राच्या परिसरातील बोरवेल व विहिरीतील पाणी आणून त्याने देवांच्या आंघोळीचे कुंड भरण्यात आले होते प्रचंड दुष्काळ असल्यामुळे नदीचे पात्र कोरडे पडले आहे. या पात्रात पाणी नसल्याने खंडोबा देवस्थानने इतर ठिकाणाहून पाणी आणण्याची व्यवस्था केली होती. सायंकाळी साडेपाच वाजता खंडोबा म्हाळसादेवींच्या मूर्तींना धार्मिक वातावरणात स्नान घालण्यात आली यावेळी ग्रामस्थांनी येत्या पावसाळ्यामध्ये करा नदीचे पात्र दुथडी भरून वाहू दे अशी प्रार्थना खंडोबाला केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In jejuri two lakh pilgrims attended somvati amavasya yatra 2024 css