कराड : सातारा जिल्ह्यात जून आणि जुलै महिन्यातील अतिवृष्टीत पाच जणांचा मृत्यू झाला. तर, २९ पशुधन दगावले. ४७४ गावे बाधित होताना ५४९ घरांची पडझड झाली. शेतीलाही फटका बसून मोठे नुकसान झाले आहे. त्यात पाटण तालुक्यात सर्वाधिक हानी झाल्याची माहिती यंत्रणेने दिली आहे. यंदा जूनच्या पहिल्या आठवड्यापासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली. जून आणि संपूर्ण जुलै महिन्यात जोरदार पाऊस होतच राहिला. जुलैच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात सलग १२-१३ दिवस मुसळधार पाऊस कोसळल्याने त्यात घरे व शेतीचे प्रचंड नुकसान झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जून महिन्यातील मुसळधार पावसात पाटण तालुक्यातील २५ गावे बाधित होवून त्यात ४१ घरांची पडझड झाली. दरम्यान, अन्य तालुक्यातही किरकोळ नुकसान झाले. जुलै महिन्यात त्याहून अधिकचे नुकसान झाले. त्यात पाटण, सातारा, जावळी, महाबळेश्वर आदी तालुक्यात ४४९ गावे बाधित होताना ५०८ घरांचे नुकसान झाले. काही घरे भुईसपाट तर, काही घरांचे किरकोळ नुकसान झाले.

हेही वाचा : केंद्राप्रमाणे राज्यातही लागू होणार नवीन पेन्शन योजना, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय!

जून, जुलैमधील अतिवृष्टीत पाच व्यक्ती व २९ पशुधनाचा मृत्यू झाला. एकूण ४७४ गावांना बाधा आली. त्यातील ५४९ घरांची पडझड झाल्याने या सगळ्या नुकसान भरपाईसाठी निधीची आवश्यकता आहे. त्याच्या मागणीची प्रशासकीय पूर्तता झाली आहे. अतिवृष्टीतील जून आणि जुलैमधील नुकसानग्रस्त घरांना २४ लाखांचा निधी लागणार आहे. त्यात जूनमधील घरांच्या नुकसानीसाठी २ लाख ४२ हजार तर जुलैमधील घरांच्या नुकसानीसाठी २१ लाख ४५ हजारांचा निधीची तर, बाधित तीन पशुधन निवाऱ्यासाठी (गोठा) नऊ हजार रुपयांची आवश्यकता आहे. पशुधनाच्या मृत्यूने संबंधित शेतकऱ्यांना साडेपाच लाखांची भरपाई शासनास द्यावी लागणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In karad 5 deaths due to heavy rainfall in june july month also livestock affected css