कराड : यशवंतराव चव्हाणांनी स्वत:च्या वैयक्तिक जीवनाकडे कधी लक्ष दिले नाही. संपूर्ण आयुष्य जनहितासाठी समर्पित केले. त्यामुळे जनतेच्या हृदयात ते घर करून राहिल्याचे गौरवोद्गार खासदार उदयनराजे भोसले यांनी कराडमध्ये काढले. दिवंगत माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी ते बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उदयनराजे पुढे म्हणाले, यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, देशाचे नेतृत्व करणारे उपपंतप्रधानही होते. अशा थोर व्यक्तीच्या समाधीस्थळी नतमस्तक होणे हे मी माझे कर्तव्य समजतो. मी लहान असताना अनेकदा ते आमच्या आजी राजमाता सुमित्राराजे यांना भेटायला यायचे तेंव्हा त्यांना जवळून बघण्याचा योग आला. माझ्या वडिलांनाही ते आवर्जून भेटायचे. एखादी व्यक्ती जेव्हा योग्य दिशेने वाटचाल करत असते. त्यावेळेस आमच्या घराण्याने त्यांना पाठबळ देणे किंवा त्यांच्यासोबत राहण्याची भूमिका घेतली. त्यामुळे आज याठिकाणी आल्यानंतर फार बरे वाटले. चव्हाणसाहेबांच्या विचारातून खूप काही घेण्यासारखे असते व योग्य दिशा मिळते असे उदयनराजेंनी सांगितले.

हेही वाचा : लोकहितासाठी अखेरपर्यंत समाजकारणच – उदयनराजे; कराडमध्ये महायुतीचा एकजुटीने भव्य मेळावा

मोठ्या लग्नाच्या यादीला वेळ जातोच

आपली दिल्लीवारी आणि भाजपाकडून उमेदवारीच्या अनेक याद्या प्रसिध्द झाल्या. पण, क्लीन चेहरा असतानाही आपल्या उमेदवारीच्या घोषणेला वेळ लागत आहे? अशी पत्रकारांनी विचारणा करताच उदयनराजे म्हणाले, क्लीन चेहरा म्हटल्याबद्दल थॅंक्यु. पण, तरीही सॉरी, कारण जरा दाढी करायचे राहून गेले. लग्नातही आपण याद्या करतोच ना? परंतु, ज्यावेळेस मोठं लग्न असते त्यावेळेस याद्यांमध्ये बरेच काही असते ना? त्याच्यात हे पाहिजे ते पाहिजे हे नको ते नको त्यामुळे मोठ्या लग्नाच्या यादीला वेळ जातोच असे उदयनराजे मिश्कीलपणे म्हणाले.

हेही वाचा : “उद्धव ठाकरेंनी शब्द फिरवला”, राजू शेट्टींचा आरोप; सांगली लोकसभेवरून टीका करत म्हणाले, “वसंतदादा पाटलांचं घराणं…”

उदयनराजेंचेच प्रतिप्रश्न

आजच्या मेळाव्यांना महायुतीतील सर्व घटक पक्षांचे नेते उपस्थित राहतील का? या प्रश्नावर उदयनराजे म्हणाले, यात तुम्ही जर शंका घेत असाल तर, याचा अर्थ मी मेळाव्याला जाऊ नये का? नेते येणार का, असे का म्हणताय? असे प्रतिप्रश्न त्यांनी केले. जेव्हा मेळावा आपण घेतो तेव्हा लोक एकत्रितपणे व्यथा मांडतात, विचारांची देवाणघेवाण होते. त्यातूनच मार्ग निघतो. त्यामुळे हे मेळावे महत्वाचे असल्याचे खासदार उदयनराजेंनी स्पष्ट केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In karad bjp mp udayanraje bhosale said yashwantrao chavan spend his whole life for people css