कराड : “एकबार मैने जो कमिटमेंट कर दि तो… मै खुद की भी नहीं सुनता” असा विश्वास देत, लाडकी बहिण योजना मतांसाठी नव्हेतर बहिणींना स्वावलंबी बनवण्यासाठी सुरु केली असून, ही योजना बंद पाडण्याची हिम्मत कोणातही नसल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. शिवजयंतीपूर्वी मालवणात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य- दिव्य पुतळा उभारणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पाटण तालुक्यातील विविध कामांचे भूमिपूजन व उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधक दुटप्पी असल्याचा ठपका ठेवत हल्लाबोल चढवला. केंद्रीय आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री प्रतापराव जाधव, साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, कृष्णा खोरे विकास महामंडळाध्यक्ष महेश शिंदे, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
राज्यातील जनता म्हणते एकनाथ शिंदे हे सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नव्हेतर कॉमन मॅन होय. त्यामुळे सर्वांना एकच सांगतो हे महायुतीचे सरकार तुमचं आहे, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला. मुळातच विरोधी नेते तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आल्याने त्यांना पंधराशे रुपयांची किंमत काय कळणार? पण, माझ्या लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयांची नक्की किंमत आहे. त्यांनी सरकारला ताकद दिलीतर हात आखडता घेणार आन्ही, लाडकी बहीण योजना ही कधीच बंद होणार नाही, कुणीही मायकलाल ही योजना बंद पाडू शकणार नाही, महायुतीचे सरकार ही देना बँक आहे, लेना बँक नाही तरी सावत्र भावना लक्षात ठेवा आणि त्यांना निवडणुकीत त्यांची जागा दाखवा असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले.
हेही वाचा : सातारा: मुलाला वाचविण्यासाठी वडिलांचा तरसाशी लढा
बदलापूरची घटना झाली तेव्हा त्या नराधमाला फाशी द्या असे विरोधक म्हणू लागले, मात्र जेव्हा त्याने पोलिसांवर हल्ल्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांनी त्याला गोळी मारली. तेव्हा हे फाशी द्या म्हणणारेच कशाला गोळी मारली? असा सवाल करतात. अशी विरोधकांची दुट्टपी भूमिका आहे. प्रत्येक विकासकामांच्या विरोधात भूमिका. सगळ्याला विरोध इतकेच यांचे काम आहे. अशांचा विधानसभा निवडणुकीत मतदार आपल्या मतपेटीतून एन्काउंटर केल्याखेरीज राहणार नसल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. बाळासाहेब ठाकरे यांनी लोकांना जपा असे आम्हाला सांगितले, तेच काम आज शंभूराज करीत आहेत, ते हुशार असून, मोक्यावर चौका कसा मारायचा हे त्यांना चांगलेच असल्याची प्रशंसा मुख्यमंत्र्यांनी शंभूराज देसाई यांची केली.
शंभूराज देसाई यांनी पाटण तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याचा मान आम्हाला मिळाल्याचे समाधान व्यक्त केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दुर्गम- डोंगराळ अशा पाटण तालुक्यात विकासाची गंगा आणली, तारळीचे पाणी शंभर मीटरपर्यंत उचलून शेतकऱ्यांना पाणी दिले, मोरणा- गुरेघरचे काम मार्गी लागेल, विकास कामात कधी कमी पडलो नाही आणखी जोमाने विकास साधू तरी येत्या विधानसभा निवडणुकीत पाटणचा आमदार म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने समर्थन देण्याची संधी द्यावी असे आवाहन शंभूराज यांनी केले.