कराड: राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासारख्या भ्रष्ट, वाचाळ, असंवेदनशील मंत्र्याला पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यांचा मुख्यमंत्र्यांनी तातडीने राजीनामा घेऊन, निवडणूक जाहीरनाम्यातील आश्वासनाप्रमाणे शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा निर्णय घ्यावा, अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने प्रशासनास दिलेल्या निवेदनात केली आहे.

शिवाजी पाटील, संदेश पाटील, दत्तात्रय भोसले, भास्कर थोरात, प्रल्हाद माने, सत्यजित पाटील, दादासाहेब पाटील, विक्रम पाटील, आनंद थोरात, विवेक कुराडे, राहुल संकपाळ आदी शेतकऱ्यांचा शिष्टमंडळात समावेश होता.

नाशिक जिल्ह्यात पीक नुकसान पाहणीवेळी शेतकऱ्यांनी कर्जमाफीविषयी विचारल्यानंतर ‘कशाला हवी कर्जमाफी? पाच- दहा वर्षे कर्जमाफीची वाट बघता, मग कर्जमाफीतून मिळालेल्या पैशातून लग्न, साखरपुडा करता’ असे संतापजनक, शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे व शेतकऱ्यांना भिकारी संबोधणारे संतापजनक वक्तव्य कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केल्याबाबत शेतकऱ्यांनी या वेळी संताप व्यक्त करीत जोरदार निषेधही केला.

निवेदनात म्हटले आहे, की महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या प्रचंड वाढल्या असून, शेतकरी आत्महत्यांत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. केंद्र सरकारचे चुकीचे आयात-निर्यात धोरण, राज्य सरकारची व्यापारी-दलालधार्जिणी धोरणे, कायदे, असंवेदनशील उदासीन लोकप्रतिनिधी व प्रशासन, प्रतिकूल निसर्ग, अतिवृष्टी, अवकाळी, दुष्काळ, नापिकी, हमीभावाचा अभाव, प्रचंड महागाई, शेतीचा वाढता खर्च यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर कर्जबाजारी होऊन आत्महत्या करत आहेत. असे असताना अलीकडेच राज्यात सत्तेवर आलेल्या महायुती सरकारने निवडणूक जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्त करू, असे आश्वासन दिले.

त्यामुळे शेतकऱ्यांनी ‘महायुती’ला भरभरून मते दिली. मात्र, ‘महायुती’च्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात असमर्थता दर्शवली असून, उलटपक्षी शेतकऱ्यांना कर्ज भरा, असे जाहीररीत्या सांगितले आहे. परिणामी, शेतकऱ्यांमध्ये नैराश्य येऊन शेतकरी आत्महत्यांमध्ये आणखीनच वाढ झाल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

अशातच कृषिमंत्री कोकाटे यांच्या संतापजनक वक्तव्याने शेतकरी संतप्त झालेत. कोकाटेंच्या संतापजनक वक्तव्याने राज्यातील शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या असून, कोकाटेंना तातडीने मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात यावे, ‘महायुती’ने आश्वासन दिल्याप्रमाणे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्त करावे, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. कोकाटे यांच्या विधानाबाबत शेतकऱ्यांनी या वेळी संताप व्यक्त करीत जोरदार निषेधही केला.