कराड : शारीरिकदृष्ट्या कमकुवत मोराला ग्रामस्थांचे प्रसंगावधान आणि वनाधिकारी, कर्मऱ्यांच्या तत्परतेमुळे जीवदान मिळाल्याची सुखद घटना साबळेवाडी (ता. पाटण) येथे घडली. मरगळलेल्या मोराला वन कर्मचाऱ्यांनी साबळेवाडीकरांच्या मदतीने ताब्यात घेऊन आवश्यक उपचार व आवडीचा पाहुणचार देऊन प्रकृतीत सुधारणेनंतर सायंकाळच्या प्रहरी नैसर्गिक अधिवासात मुक्त संचारासाठी सोडले आहे.
हेही वाचा :वन पर्यटनात नियम मोडल्यास २५ हजारांपर्यंतचा दंड
साबळेवाडीचे माजी सरपंच निवासराव साबळे यांना ज्वारी पिकात राष्ट्रीय पक्षी असलेला मोर अशक्त अवस्थेत जागीच खिळून राहताना अधून मधून फडफडत असल्याचे निदर्शनास आले. अवकाशात झेप घेण्याची, हवेत उडण्याची ताकद त्याच्यात नसल्याने हा मोर केवळ पंखाने सरपटत होता. तो कुपोषित राहिल्याची शक्यता होती. यावर निवासराव साबळे यांनी तातडीने वन कर्मचाऱ्यांना कळवताच त्यांनी साबळेवाडीत जाऊन त्या मोराला ताब्यात घेतले. निवास साबळे, अनंत साबळे व ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते. पुढे या मोरावर पशुधन विकास अधिकारी डॉ. ऋषिकेश व्हनाळे यांच्या सूचनेनुसार पशुवैद्यकीय केंद्रात औषधोपचार करण्यात आले. मरगळलेल्या या मोराला काहीवेळ वन कार्यालयात देखरेखीखाली ठेवण्यात आले. मक्याची कणसे, पावटा, गाजरे, ओला हरभरा असा त्याच्या आवडीचा पाहुणचार मिळाल्याने या मोराला शारीरिक ताकद मिळाली. वनक्षेत्रपाल राजेश नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल शशिकांत नागरगोजे, अमृत पन्हाळे, वनरक्षक सतीश वीर, प्रशांत लवटे, शरद टाले, वनकर्मचारी हरीश बोत्रे, अनिकेत पाटील, अजय कुंभार आदींनी यासाठी सहकार्य केले. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर सायंकाळी मोराला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.