कराड : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार कायम असून, धरणसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. १०५.२५ अब्ज घनफूट (टीएमसी) क्षमतेच्या कोयना शिवसागराचा जलसाठा १०२.६५ अब्ज घनफूट (९७.५३ टक्के) झाला आहे. तर, हा जलसाठा नियंत्रित करण्यासाठी धरणाच्या सहा वक्री दरवाजातून जलविसर्ग वाढवण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोयना धरणाचे सहा दरवाजे सव्वाफुटाने उचलून कोयना नदीपात्रात सुरू असलेला प्रतिसेकंद १०,३५५ घनफूट (क्युसेक) जलविसर्ग आज बुधवारी दुपारी दोन वाजल्यापासून सहाही दरवाजे दोन फुटाने उचलून प्रतिसेकंद १७,४३७ घनफूट करण्यात येत आहे. तर, पूर्वीचा पायथा वीजगृहातून २,१०० घनफूट जलविसर्ग सुरूच असल्याने प्रशासनाने कृष्णा- कोयना नद्यांकाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे. सध्या कोयना धरणात प्रतिसेकंद ४०,२१७ घनफूट पाण्याची आवक होत आहे. त्यात वाढ झाल्यास धरणाच्या दरवाजातील विसर्ग त्या- त्या प्रमाणात वाढवण्यात येणार असल्याचे कोयना धरण प्रशासनाने स्पष्ट केले आहे. कोयनेबरोबरच सातारा जिल्ह्यातील कण्हेर, उरमोडी धरणांमधून सुध्दा जलविसर्ग सुरू आहे. कोयना, नीरा, उरमोडी आणि वेण्णा नदीकाठी प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

हेही वाचा : सोलापूर: अल्पवयीन मुलीचा वृद्धांकडून विनयभंग

पश्चिम घाटक्षेत्रात सर्वदूर जोरदार पाऊस कायम आहे. त्यामुळे बहुतेक धरणसाठे पुन्हा ओसंडू लागले आहेत. पात्रात विसावलेल्या नद्या आता दुथडी वाहत आहेत. बुधवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत गेल्या २४ तासांत कोयनेच्या पाणलोटातील कोयनानगरला ११४ एकूण ४,८८४ मिलीमीटर, नवजाला १४८ एकूण ५,७७८ मिलीमीटर तर, महाबळेश्वरला १९० एकूण ५,६९७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. धोम धरणक्षेत्रात १३ मिलीमीटर, कास ३६, कुंभी ५३, दुधगंगा १८, धोम-बलकवडी २४, वारणा १२, नागेवाडी ३, कडवी २० तर, तारळी धरण परिसरात १३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. अन्यत्र, मांडुकली व वाळवण येथे ४५ मिलीमीटर, सांडवली ६२, प्रतापगड ४०, पाथरपुंज १६, मोळेश्वरी व निवळे ३०, वाकी ३७, सावर्डे ४२, पडसाली येथे ४८ मिलीमीटर पाऊस झाला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In karad heavy rainfall in western ghat koyna dam water discharged css