कराड : मुंबईहून कर्नाटकाला हवालाची तीन कोटींची रक्कम पोहोचवण्यासाठी निघालेल्या मोटारगाडी चालकाला ‘हनी ट्रॅप’च्या जाळ्यात ओढून हा सशस्त्र दरोडा टाकण्यात आला, समाज माध्यामातून संपर्कात आलेल्या महिलेने चालकाचे ‘लोकेशन’ शोधले आणि ‘हनी ट्रॅप’मुळे चालक गुन्ह्यात अडकल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे. संबंधित महिलेसह १० जण गजाआड झाले आहेत.
पुणे- बंगळुरू महामार्गावर कराडजवळ चार दिवसांपूर्वी मंगळवारी उत्तररात्री झालेल्या या सशस्त्र दरोड्यातील तीन कोटींपैकी २ कोटी ८९ लाख ३४ हजारांची रक्कम स्थानिक गुन्हे शाखा व कराड शहर पोलिसांनी हस्तगत केली आहे. या टोळीने दरोड्यासाठी दोन महिने रेकी केली. फिर्यादी चालक शैलेश घाडगे व बदली चालक अविनाश घाडगे या दोघांवरही गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले.
अजमेर मोहमंद मांगलेकर (३६, रा. गोळेश्वर- कराड), नजर मोहमंद आरीफ मुल्ला (३३, रा. रविवार पेठ, कराड) करीम अजीज शेख (३५, रा. मंगळवार पेठ, कराड), नजीर बालेखान मुल्ला (३३, रा. सैदापूर) यांच्यासह रक्कम घेऊन निघालेल्या मोटारगाडीचे चालक शैलेश शिवाजी घाडगे (२४) व अविनाश संजय घाडगे (२१, दोघेही रा. निमसोड, ता. खटाव), ऋतुराज धनाजी खडंग (२१), त्याचा भाऊ ऋषिकेश (२६) तसेच अक्षय अशोक शिंदे (२१, तिघेही रा. तांबवे, ता. कराड) आणि कराडच्या मंगळवार पेठेतील संशयित महिला अशांना अटक झाली आहे.
कराडच्या कुख्यात गुंडाचाही गुन्ह्यात सहभाग समोर आला असून, तो व आणखी एक इसम फरार आहे. तेही लवकरच हाती येतील, असा पोलिसांना विश्वास आहे. संशयित महिलेची समाज माध्यमावर चालक घाडगे याच्याशी ओळख होऊन त्यांच्यात संवादही होता. दोन महिन्यांपूर्वी दूरचित्रसंपर्क झाला. त्यावेळी त्याने हवालाचे पैसे पोहोचवण्यासाठी निघाल्याचे तिला दाखवले. ही माहिती त्या महिलेने तिच्या ओळखीच्या मांगलेकरला आणि त्याने मुख्य सूत्रधारास दिली आणि लुटीचा कट शिजला. दोन्ही कार चालकांना लुटीतीलच १७ लाखांची रक्कम देण्यासह खोटी फिर्याद देण्यास सांगण्यात आले. मात्र, फिर्यादीच्या माहितीत विसंगती आढळल्याचे पोलिसांनी सांगितले.
सक्त वसुली संचालनालय (ईडी) व प्राप्तिकर (इन्कम टॅक्स) विभागही तपास करणार
हवालाची ही मोठी रक्कम कोणाला पोचवायची होती कोणाला द्यायची होती हे अद्याप तपासात पुढे आले नसल्याने पोलिसांनी या रकमेची खातर जमा करण्यासाठी सप्त वसुली संचालनालय व प्राप्तिकल विभागास कळवले असून यासह अन्य संबंधित विभाग या रोकड संदर्भात विशेष तपास करणार आहेत.