कराड : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे समर्थक समजले जाणारे मलकापुरातील काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते, मलकापूर पालिकेचे माजी बांधकाम सभापती शंकरराव चांदे आणि काँग्रेसचे मलकापूर शहराध्यक्ष, माजी सभापती प्रशांत चांदे, तसेच सतीश चांदे व धनाजी देसाई यांच्यासह कार्यकर्त्यांनी मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात ‘कराड दक्षिण’चे आमदार डॉ. अतुल भोसले यांचे नेतृत्व स्वीकारत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पक्षाचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काँग्रेसमधून भाजपत आलेल्या सर्वांचे स्वागत केले. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, आमदार डॉ. अतुल भोसले आदींची उपस्थिती होती.

काँग्रेसचे मलकापूर शहराध्यक्ष प्रशांत चांदे हे मलकापूर नगरपालिकेचे माजी शिक्षण व नियोजन सभापती आहेत. तर, शंकरराव चांदे मलकापूर नगरपालिकेत १५ वर्षे नगरसेवकपदी राहिलेले आहेत. यापैकी १० वर्षे ते बांधकाम तसेच शिक्षण व नियोजन सभापती राहिले आहेत. नगरपालिका होण्यापूर्वी १२ वर्षे ते मलकापूर ग्रामपंचायतीचे सदस्य होते. प्रशांत चांदे हे त्यांचे पुतणे आहेत. त्यांचा भाजप प्रवेश माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण गटाला धक्का मानला जातो.