कराड : राष्ट्रीय व राज्यस्तरावरील विविध योजना यशस्वीपणे राबवणारी पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी राज्यातील पहिले सौरग्राम होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. सध्या गावातील प्रत्येक घरावर सौरऊर्जानिर्मितीची यंत्रणा बसवली जात असून, येत्या १० ऑगस्टपूर्वी हे काम शंभर टक्के पूर्ण होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मान्याचीवाडी ग्रामस्थांनी अनेक योजना, उपक्रमांमधून पर्यावरणसंवर्धन, संतुलन राखण्याची उत्कृष्ट कामगिरी केली. त्यातून ‘माझी वसुंधरा’ अभियानात राज्य शासनातर्फे ग्रामपंचायतीचा ५० लाखांच्या बक्षिसासह दोनदा गौरव झाला. याच एक कोटी रुपयांतून हा महत्त्वाकांक्षी सौरग्राम प्रकल्प पूर्णत्वाकडे असून, मान्याचीवाडी ‘पहिले सौरग्राम’च्या निमित्ताने पुन्हा सर्वदूर झळकणार आहे.

हेही वाचा : रायगड: कर्जतच्या प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राकडून भाताची तीन नवी वाणं विकसित…

राज्य व केंद्र शासनाकडून अपारंपरिक ऊर्जानिर्मितीस प्रोत्साहन असल्याची संधी घेण्याचा ग्रामस्थांनी निर्णय घेतला. त्यानुसार प्रत्येक मिळकतदाराने ‘ऑनग्रीड सौरऊर्जानिर्मिती’ची शासकीय प्रक्रिया पूर्ण केली. गावात मान्याचीवाडीमध्ये शंभर किलोवाॅट वीजनिर्मितीचा प्रकल्प उभारला जात आहे. यातून रोज पाचशे युनिट विजेची निर्मिती होणार आहे. गावाची गरज सध्या तीनशे युनिट असून, उर्वरित दोनशे युनिट विजेची महावितरणला विक्री केली जाणार आहे.

‘टाटा सोलर पाॅवर कंपनी’चे सन्मित्र सोलर एनर्जीच्या माध्यमातून दहा तंत्रज्ञ, कर्मचारी हा प्रकल्प उभारत असून, मान्याचीवाडीने स्वच्छतेपासून सुरू केलेला प्रवास आता अपारंपरिक ऊर्जानिर्मितीपर्यंत पोहोचला आहे. यात सौरऊर्जा निर्मात्याने दैनंदिन ‘महावितरण’चीच वीज वापरायची असून, सौरऊर्जेतून निर्माण झालेली वीज ‘महावितरण’ घेणार आहे. आणि याचा हिशेब दर वर्षी ३१ मार्चला होऊन, सौरऊर्जेतून मिळालेल्या जादा विजेचा मोबदला महावितरण सौरऊर्जा निर्मात्यांना देणार, अशी ही योजना आहे.

हेही वाचा : Sachin Waze On Anil Deshmukh : सचिन वाझेंचे अनिल देशमुखांवर गंभीर आरोप; म्हणाले, “त्यांच्या पीएमार्फत…”

वीजदरवाढीला कायमस्वरूपी पर्याय

मान्याचीवाडी आता राज्यातील प्रत्यक्ष पहिले सौरग्राम होण्याच्या उंबरठ्यावर आहे. यामध्ये घर तिथे एक किलोवाॅट, ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, अंगणवाडीसाठी पाच किलोवाॅट, तर विहिरींवर चार किलोवाॅटचा स्वतंत्र सौरऊर्जा प्रकल्प असणार आहे. त्यातून ऊर्जा उत्सर्जन, ‘कार्बन न्यूट्रल’च्या मदतीसह वीजदराच्या सततच्या दरवाढीला कायमस्वरूपी पर्याय मिळाला आहे.

हेही वाचा : रायगडातील २८ पैकी २४ धरणे भरली, हेटवणे धरणातही ९० टक्के पाणी साठा

ग्रामस्थांचे ऐक्य, विविध अभियानांतील सातत्यामुळेच मान्याचीवाडीचा नावलौकिक सातासमुद्रापार पोहचला आहे. राज्य शासनाचे ‘माझी वसुंधरा अभियान’, केंद्र शासनाची ‘प्रधानमंत्री सूर्यघर योजना’ आणि ग्रामस्थांच्या योगदानामुळे पहिले सौरग्राम प्रकल्प छोट्याशा गावात यशस्वी होत आहे. साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाचे सचिव प्रवीण दराडे, अभियान संचालक सुधाकर बोबडे, ‘महावितरण’चे बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांच्या मार्गदर्शनाखाली मान्याचीवाडी पहिले सौरग्राम म्हणून आकारास येत आहे.

रवींद्र माने (सरपंच, मान्याचीवाडी)
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In karad manyachiwadi village will be maharashtra s first saur gram village css