कर्जत: राज्यातील सर्वात लक्षवेधी असणाऱ्या कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये आमदार प्रा. राम शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. भारतीय जनता पक्षाचे कर्जत तालुक्यातील नेते राजेंद्र देशमुख यांनी हजारो समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. कर्जत तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचा मोठा नेता असलेले राजेंद्र देशमुख यांनी राशीन येथे समर्थकांचा मेळावा घेतला. व या मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटामध्ये प्रवेश करून आमदार रोहित पवार यांच्या सोबत काम करण्याचे जाहीर केले. त्यांनी ही घोषणा करताच हजारो समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी व टाळ्या वाजवून स्वागत केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. आमदार राम शिंदे उद्या शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. आणि नेमके त्याच्या आदल्या दिवशी रोहित पवार यांनी राम शिंदे यांना मोठा धक्का दिला आहे. त्यांच्या पक्षाचा बडा नेता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये शरद पवार गटात घेतला आहे. यामुळे याचा मोठा फटका भारतीय जनता पक्षाला बसणार आहे.

हेही वाचा : चिपळूण-संगमेश्वर मधील राष्ट्रवादी विरुध्द राष्ट्रवादी लढतीत मुस्लीम मते निर्णायक ठरणार

पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेते

राजेंद्र देशमुख यांचे आजोबा व वडील हे जुने काँग्रेस पक्षाचे अहिल्यानगर जिल्ह्यातील बडे नेते म्हणून ओळखले जातात. कर्जत तालुक्यातील जगदंबा सहकारी साखर कारखाना उभारणीमध्ये दिवंगत नेते बापूसाहेब देशमुख यांनी मोलाचे योगदान दिले होते. सन २००९ विधानसभा निवडणुकीमध्ये अवघ्या काही मतांनी बापूसाहेब देशमुख यांचा पराभव झाला होता. यानंतर सन २०१४ ला राजेंद्र देशमुख यांनी काँग्रेस पक्ष सोडून आमदार राम शिंदे यांच्यासोबत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करून त्यांना विजय करण्यामध्ये मोलाची कामगिरी बजावली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये देखील त्यांनी राम शिंदे यांचे व भाजपचे काम केले होते. मात्र आमदार राम शिंदे यांनी व पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी कधीही निवडणुकीनंतर देशमुख यांना कोणत्याही कामाच्या संदर्भात विश्वासात घेतले नाही. यामुळे भारतीय जनता पक्षात सातत्याने डावलले जात असल्यामुळे अखेर विधानसभेच्या निवडणुकीच्या पहिल्याच टप्प्यात त्यांनी राम शिंदे व भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. यामध्ये आमदार रोहित पवार यांचे मुसिद्धी राजकारण कामी आले. आमदार राम शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमधील अनेक लहान मोठे नेते भाजप सोबत घेतले मात्र रोहित पवार यांनी ऐन निवडणुकीच्या रणधुमाळी मध्ये भाजपचा बडा नेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये घेऊन मोठा शहर कर्जत जामखेड मतदार संघात भाजपला दिला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In karjat assembly constituency bjp leader rajendra deshmukh joined ncp sharad pawar party css