कर्जत : शहर प्लास्टिक मुक्त करण्यासाठी नगरपंचायतचे मुख्याधिकारी अक्षय जायभाय यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी आज कर्जत शहरामध्ये प्लास्टिक पिशव्या व प्लास्टिक वस्तू ज्यावर बंदी आहे त्याचा वापर करणाऱ्या व्यापाऱ्यांवर धाडसी कारवाई केली आहे. या पथकामध्ये संतोष समुद्र, अजिनाथ गीते यांच्यासह पालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांचा सहभाग होता.
कर्जत शहर प्लास्टिक मुक्त करण्यासाठी नगरपंचायतने पुढाकार घेतला आहे. सर्व दुकानांमधून मोठ्या प्रमाणामध्ये सर्रास नागरिकांना बंदी असताना देखील प्लास्टिक पिशव्या देण्यात येत आहेत. यामुळे नगरपंचायतच्या भरारी पथकाने आज शहरातील अनेक दुकानांची तपासणी केली. व ज्या दुकानांमध्ये प्लास्टिक पिशव्या आढळून आल्या त्या सर्व जप्त केल्या एवढेच नव्हे तर जेवढ्या प्रमाणामध्ये प्लास्टिक पिशव्या सापडल्या त्या पद्धतीने अनेक व्यापाऱ्यांना आर्थिक दंड देखील करण्यात आला आहे. यामुळे मोठी खळबळ व्यापाऱ्यांमध्ये उडाली आहे.
पर्यावरण प्रेमींकडून स्वागत
कर्जत शहर स्वच्छ सुंदर रहावे यासाठी नगरपंचायतने कठोर भूमिका घेण्याची मागणी वारंवार पर्यावरण प्रेमींकडून करण्यात आल्या होती मात्र याबाबत मागील काही दिवसांपासून कारवाई थंडावल्या होत्या. मात्र नवीनच आलेले मुख्याधिकारी अक्षय जायभाय यांनी मात्र कर्जत शहराला सर्वच बाबतीत शिस्त लावण्यासाठी कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यांनी मागील दोन दिवसांपूर्वी थकबाकीदार व्यापाऱ्यांकडून वसुली अभियान राबवले. यानंतर आता त्यांनी कर्ज शेअर प्लास्टिक मुक्त करण्यासाठी आणि कुणीही प्लास्टिकचा वापर करू नये यासाठी पुढाकार घेतला आहे.
चहाच्या टपऱ्यांवर कारवाई होणार
सध्या सर्रास चहाच्या टपऱ्यांवर प्लॅस्टिकच्या ग्लास मधून चहा दिला जातो. देण्यात येणाऱ्या या प्लास्टिकच्या ग्लासमुळे कॅन्सर सारखे आजार निर्माण झाले असून आरोग्यास धोका निर्माण झाला आहे यामुळे हॉटेल चालकांनी देखील काचेचे ग्लास किंवा कफ वापरावे अशी मोहीम नगरपंचायत कर्जत यांच्यामार्फत उघडण्यात आले असून पुढील काळामध्ये या चहाच्या टपरीवर प्लास्टिकचे ग्लास आढळून येतील किंवा विक्रीसाठी ठेवणाऱ्या दुकानदारांवर देखील कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती मुख्याधिकारी अक्षय जायभाय यांनी दिली.