कर्जत : मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्दयी पणे हत्या झाल्याचे नवीन फोटो मधून निष्पन्न होताच त्याचे तीव्र पडसाद अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे उमटले आहेत. आज संतप्त सकल मराठा समाज यांच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी व धनंजय मुंडे यांना सह आरोपी करावे अशी मागणी आंदोलन कर्त्यांनी केली.

संतोष देशमुख यांची हत्या अतिशय निर्दयीपणे केल्याचे आता उघड झाले आहे. ही बाब आज निदर्शनास आल्यानंतर त्याचे पडसाद तात्काळ उमटले आहेत. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सकल मराठा समाजाची युवक एकत्र आले. त्यांनी रस्ता रोको आंदोलन केले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनामुळे मेन रोड वरील सर्व वाहतूक ठप्प झाले होते.

यावेळी बोलताना सकल मराठा समाजाची समन्वयक रावसाहेब धांडे म्हणाले की, संतोष देशमुख यांची हत्या अतिशय निर्दयपणे करण्यात आली आहे. ते आता उघड झाले आहे. या खून प्रकरणातील सर्व आरोपी अद्याप अटक झालेले नाहीत. यामध्ये राजकीय हस्तक्षेप होत असल्याचे आता उघड झाले आहे. यामुळे या घटनेला धनंजय मुंडे हे देखील जबाबदार आहेत. त्यांचा तात्काळ राजीनामा घेऊन त्यांना सह आरोपी करण्यात यावे. तसेच या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ पोलीस प्रशासनाने अटक करावी. अन्यथा उद्या दिनांक पाच मार्च रोजी कर्जत शहर बंद ठेवण्यात येणार आहे.

यावेळी एडवोकेट धनंजय राणे, व राहुल नवले यांची भाषणे झाली. घटनास्थळी पोलीस अधिकारी व कर्मचारी दाखल झाल्यानंतर त्यांनी आंदोलकांशी चर्चा केली. पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव व नायब तहसीलदार यांना सकल मराठा समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले. यामध्ये या घटनेचा निषेध करताना सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी माजी मंत्री धनंजय मुंडे यांना आरोपी करावे व दिनांक पाच मार्च रोजी कर्जत शहर बंद राहील असा इशारा देण्यात आला आहे.

Story img Loader