कर्जत : भगवानगड येथील महंत नामदेव शास्त्री यांचा आज कर्जत येथे सकल मराठा समाज व मराठा महासंघ यांच्या वतीने निषेध करण्यात आला. भगवानगडचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना पाठिंबा देताना जे वादग्रस्त वक्तव्य केले त्याचे तीव्र पडसाद अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे उमटले आहेत. कर्जत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सकल मराठा समाज यांच्या वतीने समन्वयक रावसाहेब धांडे यांच्या उपस्थितीमध्ये महंत नामदेव शास्त्री यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच त्यांच्या वर प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी करणारे निवेदन पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांना देण्यात आले.
समन्वयक रावसाहेब धांडे म्हणाले की, भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी जे वक्तव्य केले यामुळे सकल मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यांचे वक्तव्य हे जातीयवादी असून गुन्हेगारांना पाठीशी घालणारे आहे. यामुळे त्यांच्या वक्तव्याचा आम्ही आज छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सर्व समाज बांधव एकत्र येऊन निषेध केला आहे. शासनाने त्यांच्यावर कारवाई करावी यासाठी पोलीस प्रशासनाला देखील निवेदन दिले आहे. जर याबाबत तात्काळ त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर पुढील काळामध्ये तीव्र आंदोलन करू असा इशारा धांडे यांनी यावेळी दिला व बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणी सरकारने याबाबत मदत करणाऱ्या सर्वांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी श्री धांडे यांनी यावेळी केली. अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक बाळासाहेब साळुंखे यांनी देखील यावेळी बोलताना तीव्र शब्दांमध्ये वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल नामदेव शास्त्री यांचा निषेध केला.