राजापूर : धार्मिक कार्य, लग्नसमारंभ असो वा देवदर्शन यासाठी मोठ्या प्रमाणात नारळाची मागणी असते. त्याचवेळी रूचकर जेवणासाठी नारळ महत्वपूर्ण असल्याने घरगुती वापरासह हॉटेल व्यावसायिकांकडून नारळाची मागणी असते. त्यातून, कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. शेतकरी-बागायतदारांच्या हातामध्ये हमखास ‘पै’का मिळवून देणारा नारळ सातत्याने बदलणारे हवामान, असंतुलित पाऊस आणि कीडरोगांचा प्रादुर्भाव यामुळे निसर्गाच्या दुष्टचक्रामध्ये अडकला आहे. त्यामुळे उत्पादन घटल्याने मागणी आणि पुरवठा याचा समतोल बिघडल्याने नारळाच्या दराने चाळीशी ओलांडली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोट्यावधी रुपयांची उलाढाल

धार्मिक कार्य, लग्नसमारंभ असो वा देवदर्शन, यासाठी मोठ्या प्रमाणात नारळाची मागणी असते. त्याचवेळी रूचकर जेवणासाठी नारळ महत्वपूर्ण असल्याने घरगुती वापरासह हॉटेल व्यावसायिकांकडून नारळाची मागणी असते. या व्यतिरिक्त शरीरपोषणासाठीही नारळपाणी उपयुक्त असल्याने नारळाच्या शहाळ्याला पसंती मिळते. त्यातून, दरवर्षी नारळ खरेदी-विक्रीतून कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत असते. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वर्षभरामध्ये विविध कारणांसाठी सुमारे २० ते २२ लाख नारळाच्या नगांची खरेदी-विक्री होते. सरासरी ३०-३५ रुपये प्रति नग किंमतीप्रमाणे वर्षभरामध्ये सुमारे ८ ते १० कोटी रुपयांची उलाढाल होत असल्याचा अंदाज आहे.

प्रतिकूल वातावरण, वादळांचा परिणाम

गेल्या काही वर्षामध्ये कोकण किनारपट्टीवर सातत्याने विविध प्रकारची वादळे येत आहेत. अतिवृष्टीचे प्रमाणही वाढले आहे. वादळे आणि अतिवृष्टीमध्ये पिळवटून नारळाच्या झाडाचा शेंडा तुटणे, पोय खराब होणे यांसारखे प्रकार घडत आहेत. एखाद्या वर्षी वादळ होऊन अशाप्रकारे नारळाच्या झाडाचे नुकसान झाल्यास त्याचा प्रतिकूल परिणाम झाडावर त्याचवर्षी न दिसता तो साधारणपणे पुढे दोन वर्षानंतर दिसून येतो. कोकण किनारपट्टीवर आलेली वादळे आणि अतिवृष्टीचा परिणाम आता दिसत आहे. अशीच काहीशी स्थिती खत आणि कीडरोग नियंत्रणाच्या योग्य नियोजनाच्या अभावाच्या परिणामाचीही आहे. सद्यःस्थितीमध्ये उत्पादन घटण्याला गेल्या चार-पाच वर्षामध्ये सातत्याने आलेली वादळे आणि अतिवृष्टीचा प्रतिकूल परिणाम असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जाते.

अपेक्षित फळधारणा नाही

बदलते हवामान, कीडरोगाचा प्रादुर्भाव, वन्यजीवांचा त्रास आदी विविध कारणांमुळे नारळाचे उत्पादन घटले आहे. सर्वसाधारणतः एका नारळाच्या झाडापासून सरासरी १२० नारळ (फळ) एका हंगामामध्ये मिळणे अपेक्षित आहे. मात्र अपेक्षित उत्पादनात घट होऊन सद्यःस्थितीमध्ये ९०-९५ फळे मिळत आहेत.

कीडरोगाच्या प्रादुर्भावाने हैराण

गेल्या काही वर्षामध्ये नारळाच्या झाडाचा शेंडा मरणे, फळगळती, फुलोरा मोडून जाणे यांसारख्या विविध समस्यांना बागायतदारांना सामोरे जावे लागत आहे. त्याच्या जोडीला विविध कीडरोगांचा प्रादुर्भावही वाढत चालला आहे. विविध प्रकारच्या औषधांची फवारणी करूनही कीडरोगावर नियंत्रण येत नसल्याने शेतकरी वा बागायतदार पुरता हैराण झाला आहे. अन्य बागायतींप्रमाणे नारळ बागायतींना माकडांच्या उपद्रवाची झळ पोहचत आहे.

श्रींची ओटी खातेय भाव

जत्रोत्सवामध्ये श्रींची ओटी भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात नारळांची मागणी असते. जत्रोत्सवात नारळ, केळी, फुले आदी व्यापार-व्यवसाय करणारे व्यापारी थेट बागायतदारांकडून घाऊक प्रमाणात नारळाची उचल करतात. त्यामुळे तुलनात्मकदृष्ट्या नारळाचे दर कमी राहत असल्याने ओटीचे दरही सर्वसामान्य भाविकांच्या आवाक्यातील असतात. मात्र, नारळाचे दर वधारल्याने ओटीचे दरही वाढणार असल्याने भाविकांनाही त्याचा फटका बसणार आहे.

उत्पन्नवाढीसाठी नारळ लागवड फायदेशीर

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सद्यःस्थितीमध्ये सुमारे चार लाख नारळ नगांचे उत्पादन होत आहे. मात्र, विविध कारणांसाठी २० ते २२ लाख नारळ नगांची मागणी असते. त्यामुळे उत्पादन आणि मागणी यामध्ये असलेला सुमारे १६ लाख नारळ नगांचा फरक भरून काढण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये केरळ, तामिळनाडू येथून नारळ आयात केला जातो. नारळाची झावळे, काथ्या आदी विविध घटकांपासून अन्य विविध उत्पादने करणेही शक्य आहे. त्यामुळे शेतकरी, बागायतदार यांनी पाणी उपलब्ध असलेल्या ठिकाणी हापूस आंबा-काजू या फलोत्पादनाच्या जोडीने नारळ बागायती विकसित केल्यास निश्‍चितच त्याचा फायदा उत्पन्नवाढीच्यादृष्टीने होणार आहे. बाजारपेठेतील अन्य वस्तूंच्या तुलनेमध्ये नारळाच्या खरेदी-विक्रीतील उलाढाल फारशी नजरेत भरणारी नसली तरी नारळाला बाजारपेठेमध्ये असलेली मागणी पाहता शेतकरी, बागायतदार आणि व्यावसायिकांसाठी नारळ हमखास उत्पन्न मिळवून देणारा ठरत आहे.

दृष्टिक्षेपात रत्नागिरी जिल्हा

  • रत्नागिरी जिल्हा नारळ क्षेत्र ः ५,६५६ हेक्टर क्षेत्र
  • वर्षभर उलाढाल ः २०-२२ लाख फळ नग
  • रत्नागिरी जिल्हा नारळ उत्पादन ः ४ लाख ६ हजार फळ नग
  • किती उत्पादन वाढवण्याची गरज ः १६ लाख फळ नग
  • रत्नागिरीतून कुठून येतात नारळ ः महाराष्ट्राच्या विविध भागांसह केरळ, तामिळनाडू

उत्पादन घटण्याची कारणे

  • सातत्याने अतिवृष्टी अन् वादळे
  • कीडरोगाचा प्रादुर्भाव
  • खत व्यवस्थापनाच्या योग्य नियोजनाचा अभाव
  • बदलते हवामान
  • माकडांचा त्रास
  • फुलोरा अन् फळगळती

सद्यःस्थितीतील नारळाचे दर

छोटा आकाराचा नारळ ः १५-२० रुपये

मध्यम आकाराचा नारळ ः २५-३० रुपये

मोठ्या आकाराचा नारळ ः ३५-४५ रुपये

सुक्या खोबऱ्याचा पर्याय

अनेकवेळा छोटे नारळ असल्यामुळे विक्रेते विकत घेत नाहीत. त्यामुळे हे नारळ बागायतदारांकडे पडून राहतात. हे नारळ फार दिवस टिकत नसल्याने ते फोडून सुकवावे लागतात. त्यापासून सुके खोबरे तयार केले जाते. या खोबऱ्याला चांगला दर मिळतो. परंतु त्यासाठी हे खोबरे उन्हात सुकवण्यापासून त्याला बुरशी येऊ नये म्हणून काळजी घ्यावी लागते. या खोबऱ्याला बाजारात १०० ते २२५ रुपये किलोपर्यंत दर मिळतो.

शेतकरी, बागायतदारांचा आर्थिक स्तर उंचावणार्‍या नारळाला गेल्या काही वर्षामध्ये हवामानातील बदल, प्रतिकूल वातावरण, वादळे आदींचा फटका बसून उत्पादन घटले आहे. त्यावर मात करण्यासाठी कीडरोग नियंत्रण, खते आणि पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. घटलेल्या उत्पादनामुळे मागणीप्रमाणे पुरवठा होत नसल्याने नारळाचे दर वाढले आहेत. नारळ नग विक्रीव्यतिरिक्त नारळाच्या विविध भागांसह अनेक उत्पादनेही घेता येतात. त्यामुळे जलस्रोत उपलब्ध असलेल्या ठिकाणी बहुपयोगी असलेल्या नारळाच्या बागायती विकसित करून शेतकर्‍यांना उत्पन्न मिळवणे अन् वाढवणे शक्य आहे.

डॉ. किरण मालशे, नारळ संशोधन केंद्र, रत्नागिरी

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In konkan rajapur coconut production reduced due to climate change css