लातूरमधील पुरणमल लाहोटी सरकारी पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या वसतीगृहात राहणाऱ्या जवळपास ५० विद्यार्थिनींना रात्रीच्या जेवणातून विषबाधा झाल्याचा प्रकार घडला आहे. त्रास झालेल्या विद्यार्थिनींवर विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत. तसेच सर्व विद्यार्थिनींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, शनिवारी हा प्रकार घडला. या वसतीगृहातील विद्यार्थिनींना सायंकाळी ७.३० वाजता जेवण देण्यात आले होते. यात भेंडीची भाजी, चपाती, भात आणि मसूरच्या दाळीचे सूप या पदार्थांचा समावेश होता. मात्र, रात्री ८.३० वाजताच्या सुमारास अचानक काही विद्यार्थिनींची प्रकृती बिघडली. तर काहींना अचानक मळमळ होऊन उलट्या सुरु झाल्या. त्यानंतर वसतीगृहाच्या अधिक्षकांनी तत्काळ याची माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्यांना दिली.

हेही वाचा – Amit Deshmukh on NCP: “मला दुबईच्या शेखची चिंता, त्याचाही पक्षप्रवेश…”, अमित देशमुखांची लातूरच्या कवी संमेलनात टोलेबाजी; म्हणाले, “राष्ट्रवादी बुद्रुक…”

दरम्यान, महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी रुग्णवाहिका बोलावून या विद्यार्थिनींना विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. तसेच याची माहिती विद्यार्थिनींच्या पालकांनाही देण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार मध्यरात्रीपर्यंत जवळपास ५० विद्यार्थिनींना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर रविवारी पहाटे जवळपास २० विद्यार्थिनींना वसतीगृहात परत पाठवण्यात आलं.

यासंदर्भात बोलताना विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहिते म्हणाले, की रात्रीच्या जेवणानंतर काही विद्यार्थिनींना मळमळ आणि उलट्या होत होत्या. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर आता काही विद्यार्थ्यांनींना वसतीगृहात परत पाठवण्यात आलं आहे. तर काही विद्यार्थिनींवर उपचार सुरू आहेत. सर्व विद्यार्थिनींची प्रकृती आता स्थिर आहे.

हेही वाचा – देवेंद्र फडणवीसांनी सुरत लुटीबाबत केलेल्या विधानावरून प्रकाश आंबडेकरांची टीका; म्हणाले, “भाजपा-आरएसएसला आजही…”

याप्रकरणी महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही.डी. नितनवरे यांनीही प्रतिक्रिया दिली. या घटनेची माहिती मिळताच आम्ही विद्यार्थिनींना रुग्णालयात दाखल केले होते. तसेच याची माहिती त्यांच्या पालकांना दिली होती. आता सर्व विद्यार्थिनींची प्रकृती स्थिर आहे. काही विद्यार्थिनींना पुन्हा वसतीगृहात पाठवण्यात आलं आहे. तर काहींवर उपचार सुरू आहेत, असे त्यांनी सांगितलं. तसेच याप्रकरणी तपास सुरु करण्यात आला असून अन्नाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.