लातूर : शेतमालाचे भाव पडलेले असताना शेतात काम करणाऱ्या सालगड्यांचा पगार एक लाख २५ हजाराहून एक लाख ४० हजारांवर गेला आहे. केवळ शेतमालच नाही तर खते व अन्य क्षेत्रातही शेतकऱ्यांना आता अधिक गुंतवणूक करावी लागणार आहे. हिंदू नववर्षारंभी ग्रामीण भागात सालगड्याचे भाव ठरतात. यात या वर्षी २० हजार रुपयांची वाढ झाली आहे.
शेतीची बहुतांश कामे आता यांत्रिक पद्धतीने होतात. शेतीतील नांगरणीसाठी गतवर्षी सतराशे रुपये एकर असा भाव होता तो यावर्षी दोन हजार २०० रुपयांवर पोहोचला आहे. पाळी घालण्यासाठी गतवर्षी ७०० रुपये प्रति एकर भाव होता तो यावर्षी आठशे रुपयावर पोहोचला आहे. त्यामुळे यांत्रिकीकरणाचेही भाव वेगवेगळ्या कारणाने वाढले आहेत. खताच्या भावातही लक्षणीय वाढ झाली आहे .युरिया व डीएपी या खताच्या भावात वाढ झाली नसली तरी अन्य खतामध्ये शंभर रुपयांपासून २५० रुपयांची वाढ झाली आहे. या शिवाय शेतीतील मजुरी वाढली आहे त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. या उलट गेले वर्षभर सर्व शेतमाल हमीभावापेक्षा कमी भावानेच बाजारपेठेत विकावा लागला. पुढील वर्ष शेतमालाचे भाव कसे राहतील, हे निश्चित नाही. मात्र, भांडवली गुंतवणुकीमध्ये आता वाढ होऊ लागली आहे.