वाई: माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक महाराष्ट्राचे लक्ष वेधत असतानाच माढ्यात काल (६ मे) रात्री पैसे वाटपावरून मोठा गोंधळ झाला होता. उत्तर कोरेगाव तालुक्यात पिंपोडे येथे काही लोक पैसे वाटत असल्याचे निदर्शनास आले. याला महाआघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाच्या समर्थकांनी विरोध केला असता दोन्हीकडून तुंबळ मारामारी झाली. या प्रकारानंतर सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी घटनास्थळी धाव घेतली.
भाजपाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी शहा नामक व्यक्ती पैसे वाटत असल्याचे घटनास्थळावरून सांगण्यात आले. त्यांच्या सोबत काही लोक होते. दरम्यान, ढमाळ नामक व्यक्तीसह अन्य चार लोकांमध्ये मारामारी झाली. यानंतर काही लोक पैसे घेऊन पळाल्याचे अनेकांनी सांगितले.
या घटनेत सुमारे सहा लाख रुपये जप्त झाल्याचेही रात्री उशिरा सांगण्यात आले. माढा मतदारसंघात कमळ आणि तुतारीमध्ये अटीतटीची लढाई सुरू आहे. विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी पूर्णत: एकतर्फी वाटत असलेला हा मतदारसंघ मोहिते पाटलांच्या बंडखोरीमुळे चुरशीचा झाला. नरेंद्र मोदींच्या महायुतीमध्ये असलेले रामराजे नाईक निंबाळकर यांनी प्रचारापासून अलिप्त राहिले आहेत. या घटनेची माहिती कळताच वाठार स्टेशन पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक हुलगे हे घटनास्थळी दाखल झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख हे घटनास्थळाकडे रवाना झाले .
हेही वाचा : रायगड: उन्हाचा त्रास झाल्याने मतदाराचा मृत्यू
ही घटना मतदारसंघाचाच्या मतदानावर परिणाम करू शकते. इतकी महत्त्वपूर्ण असल्यामुळे धैर्यशील नाईक निंबाळकर, रणजितसिंह मोहिते पाटील त्याचबरोबर रामराजे नाईक निंबाळकर यांच्या फोनाफोनीचे सत्र सुरू आहे. दरम्यान, हे पैसे कोणकोणत्या पक्षासाठी वाटत होते याबाबत पोलीस दलाकडून स्पष्टपणे सांगितले नाही. या प्रकरणी पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी हा प्रकार दिवसाच घडला असून सापडलेले पैसे हे फूल विक्रीचे असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे दोन्ही गटांच्या लोकांना तक्रारी दाखल करण्यास पोलिसांकडून सांगण्यात आल्याचे त्यांनी सांगितले .