सोलापूर / जालना / चंद्रपूर : नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्यात तीन ठिकाणी झालेल्या अपघातांत ११ जणांचा मृत्यू झाला असून ११ जण जखमी झाले आहेत. जालना जिल्ह्यात सोलापूर-धुळे महामार्गावर महाकाळ (ता. अंबड) गावाजवळ बुधवारी दुपारी उभ्या मालवाहू वाहनावर मोटार आदळली. यात भागवत चौरे (४७), सृष्टी चौरे (१३), वेदांत चौरे (११, तिघेही रा. जालना) आणि अनिता कुंटे (४८, रा. छत्रपती संभाजीनगर) यांचा मृत्यू झाला.
अक्कलकोटमध्ये दर्शन आटोपून गाणगापूरकडे निघालेल्या भाविकांच्या वाहनाला मालमोटारीने धडक दिली. यात गंगाधर कुणीपल्ली (४६), त्यांची पत्नी सागरबाई (४०, रा. केरूर, ता. बिलोली, जि. नांदेड), हनमलु गंगाराम पाशावार (३५) आणि त्यांची मुलगी वैष्णवी ऊर्फ ऐश्वर्या (१४, रा. कोंडळवाडी, ता. बिलोली, जि. नांदेड) यांचा मृत्यू झाला. जखमींमध्ये तीन बालकांसह पाच महिला आणि चार पुरुषांचा समावेश असून त्यांच्यावर सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यात समोरून येणाऱ्या ट्रकवर दुचाकी धडकून एकाच कुटुंबातील तिघे ठार झाले. सतीश नागपुरे (५१), मंजुषा नागपुरे (४७) व माहिरा नागपुरे अशी त्यांची नावे आहेत. नागपूर-चंद्रपूर मार्गावरील डाली पेट्रोलपंपासमोर मंगळवारी रात्री हा अपघात झाला. वणी तालुक्यातील रासाघोणसा येथील नागपुरे कुटुंब भद्रावती येथे नातेवाईकांची भेट घेऊन परत जात होते.