मुंबई : देशाच्या बहुतांश भागात झालेला समाधानकारक पाऊस, बाजारातील आकर्षक सुवर्ण खरेदी योजना आणि शुभ मुहूर्तावर खरेदीची परंपरा यामुळे दसऱ्याला सराफी बाजारात सोनेखरेदीची लगबग व उत्साह दिसून आला.
दसरा हा सोनेखरेदीचा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. त्यामुळे सोन्याचा भाव आता दहा ग्रॅमला स्थानिक सराफ बाजारात ७६,७०० रुपयांच्या पुढे गेला असला, तरी परंपरेमुळे यंदाही लोकांनी सोनेखरेदी गर्दी केली. मुहूर्तावर सोनेखरेदीचे महत्त्व असल्याने दुपारी असलेल्या विजय मुहूर्तामुळे दालनांमध्ये खरेदीला गर्दी झाली असे पीएनजी अँड सन्स लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित मोडक यांनी सांगितले. आजकाल गुंतवणूक म्हणून ‘गोल्ड ईटीएफ’ अर्थात म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून ‘पेपर गोल्ड’ घेण्याकडेही नागरिकांचा कल वाढत असल्याचे गुंतवणूकतज्ज्ञांनी सांगितले.
जळगावात १० कोटींची उलाढाल
शहरातील सुवर्ण बाजारपेठेत शनिवारी दसरा सणानिमित्त सोने खरेदीसाठी मोठी गर्दी झाल्याने दिवसभरात सुमारे १० कोटी रुपयांची उलाढाल झाली. आदल्या दिवशीच्या तुलनेत सोने दरात प्रति १० ग्रॅम ४०० रुपयांनी वाढ झाली. सुवर्ण बाजारात शुक्रवारी २४ कॅरेट सोन्याचा दर ७६,२०० रुपये प्रति १० ग्रॅम होता, तर २२ कॅरेटचा दर ६९, ८५३ रुपये इतका होता.
तुलनेत शनिवारी २४ कॅरेट सोन्याचा दर ४०० रुपयांनी वधारून ७६,६०० रुपये झाला. २२ कॅरेटच्या दरात ३१७ रुपयांनी वाढ होऊन ते ७०,१७० रुपये झाले. चांदीचे दर शुक्रवारी ९२,००० रुपये प्रतिकिलो तर, शनिवारी ९१,७५० रुपये असे होते.
हेही वाचा : Baba Siddique Shot Dead : राजकारणातला अजातशत्रू! गोळीबारात ठार झालेले बाबा सिद्दीकी कोण होते?
गेल्या वर्षी झालेल्या विक्रीच्या तुलनेत यंदा दसऱ्याला १० टक्के अधिक विक्री झाली. १४ कॅरेट दागिन्यांना विशेष मागणी होती. कारण सोन्यापोटी होणारा खर्च काही प्रमाणात कमी होत असल्याने या दागिन्यांकडे ओढा अधिक होता.
सोन्याचे भाव आवाक्यात असल्याने जळगाव शहरातील सुवर्ण बाजारात दसऱ्याला सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी झाली होती. ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याने सोनेखरेदी व विक्रीत मोठी उलाढाल झाली. – अजय ललवाणी (अध्यक्ष, सराफ बाजार संघटना, जळगाव)