मुंबई : राज्यातील घरगुती, औद्योगिक, वाणिज्यिक वीजग्राहकांना दिलासा मिळणार असून एक एप्रिलपासून वीजबिल कमी होणार आहे. राज्य वीज नियामक आयोगाने महावितरण, टाटा, अदानी व बेस्टसह अन्य वीज वितरण कंपन्यांचे नवीन वीज दर लागू करण्यास आयोगाने शुक्रवारी मध्यरात्री मंजुरी दिली. स्मार्ट मीटर (टीओडी) बसविणाऱ्या औद्योगिक, वाणिज्यिक ग्राहकांना सकाळी नऊ ते सायंकाळी पाच आणि रात्री बारा ते सकाळी सहापर्यंतच्या वीजवापरास १०-३०टक्के वीजदर सवलत मिळेल, मात्र सायंकाळी पाच ते रात्री १०-१२ वाजेपर्यंतच्या वीजवापरासाठी २० टक्के जादा मोजावे लागतील. म्हणजे त्यांना एका हाताने दिलेला लाभ दुसऱ्या हाताने काढून घेतला जाईल.
महावितरण व अदानी कंपनीचे वीजदर एक एप्रिलपासून सरासरी १० टक्के, टाटा कंपनीचा १८ टक्के तर बेस्टचा वीजदर ९.८२ टक्के कमी होईल. पुढील पाच वर्षात अपारंपारिक क्षेत्रातील सौर व अन्य स्वस्त वीज उपलब्ध होणार असल्याने वीजदर कमी होणार आहेत.
मात्र कृषीग्राहकांसाठी औद्योगिक, वाणिज्यिक व अन्य ग्राहकांवर पडणारा क्रॉस सबसिडीचा बोजा एक एप्रिलपासून पुढील पाच वर्षात टप्प्याटप्प्याने कमी करण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांचे वीजदर कमी होऊन दिलासा मिळणार आहे. राज्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी निवासी हॉटेल्स, गेस्ट हाऊस आदींना वाणिज्यिक ऐवजी औद्योगिक ग्राहकांच्या श्रेणीत टाकण्यात आले असून त्यांचे वीजबिल लक्षणीय कमी होऊन त्यांना दिलासा मिळणार आहे.
‘ पंतप्रधान सूर्यघर योजना ‘ ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना असून ती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोचविण्याचे केंद्र व राज्य सरकारचे प्रयत्न आहेत. छतावरील सौरऊर्जा प्रकल्प उभारलेल्या घरगुती वीज ग्राहकांनी दिवसा निर्माण केलेली अतिरिक्त वीज महावितरणला पुरवून त्यांच्या अन्य वेळच्या वीजवापरातून त्याची वजावट मिळत होती. त्यामुळे या ग्राहकांना शून्य वीजबिल येईल, असा प्रचार झाला व योजनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. मात्र दिवसा निर्माण होणाऱ्या अतिरिक्त वीजेची वजावट कमाल वीज मागणीच्या काळात (सायंकाळी पाच ते रात्री १०) मिळणार नाही, असे महावितरणने प्रस्तावित केले होते. मात्र त्यास आयोगापुढील सुनावणीत व इतरांनीही जोरदार विरोध केला.
ही तरतूद केल्यास छतावरील सौर ऊर्जा योजनेस ग्राहकांचा प्रतिसाद कमी होईल, अशी भीती व्यक्त होती. त्यामुळे या योजनेवर कोणताही परिणाम होणार नसल्याची भूमिका महावितरणने आयोगापुढे व्यक्त केली. त्यामुळे छतावरील सौरऊर्जा प्रकल्प उभारलेल्या घरगुती ग्राहकांच्या अतिरिक्त वीजेच्या वजावटीसाठी सध्याचीच कार्यपद्धती कायम राहील आणि त्यांना कोणत्याही वेळत अतिरिक्त वीज वजावट मिळेल, असे आयोगाने आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे.
राज्य वीज नियामक आयोगाचे अध्यक्ष संजय कुमार आणि सदस्य आनंद लिमये व सुरेंद्र बियाणी यांनी सर्व वीज कंपन्यांच्या आगामी पाच वर्षातील वीजदर प्रस्तावांना गेल्या दोन-तीन महिन्यात अनेक सुनावण्या झाल्यानंतर शुक्रवारी रात्री उशिरा मंजुरी दिली.
स्मार्ट मीटरसाठी दिवसा सवलत
राज्यातील कृषी वगळता सर्व वीजग्राहकांसाठी स्मार्ट मीटर (टीओडी) टप्प्याटप्प्याने बसविण्यात येणार असून औद्योगिक व वाणिज्यिक ग्राहकांसाठी प्राधान्य राहील. हे मीटर बसविणाऱ्या ग्राहकांसाठी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या सौर ऊर्जानिर्मितीच्या काळातील वीजवापरासाठी प्रतियुनिट ८० पैसे ते एक रुपया सवलत मिळेल. स्मार्ट मीटर बसविणाऱ्या औद्योगिक व वाणिज्यिक ग्राहकांना रात्री १२ ते सकाळी सहा, सकाळी ९ ते सायंकाळी पाच या वेळेत १० ते ३० टक्के वीजदर सवलत मिळेल. मात्र सायंकाळी पाच ते रात्री १०-१२ या वेळेतील वीजवापरासाठी २० टक्के वीज आकार अधिक राहील.
महावितरणचे वीजदर : महावितरणे ४८०६६ कोटी रुपये महसुली तूट दाखविली होती, मात्र आयोगाने ४४४८० कोटी रुपये मंजूर केले आहेत. वितरण हानी १४ टक्के अपेक्षित होती, ती २२ टक्क्यांपर्यंत वाढली, इंधन खर्चात वाढ व अन्य कारणांमुळे तूट वाढल्याचा महावितरणचा दावा होता. सरासरी वीजपुरवठ्याचा सरासरी दर २०२४-२५ मध्ये प्रति युनिट ९.४५ रुपये इतका होता. पुढील पाच वर्षांत तो अनुक्रमे ८.४६,८.३८,८.३०,८.२२ व ८.१७ इतका राहील. औद्योगिक ग्राहकांसाठी क्रॉस सबसिडीचे प्रमाण (एचटी)११३वरून १०१ टक्के आणि (एलटी) १०८ वरून १०० इतके या वर्षी कमी होणार असून पुढील पाच वर्षात ते आणखी कमी होणार आहे. निवासी ग्राहकांसाठी एक एप्रिलपासून १०-१२ टक्के वीजदरात कपात होत असून पाचव्या वर्षी ही कपात २४ टक्क्यांवर जाईल. सौरऊर्जानिर्मितीत वेगाने वाढ होत असून स्वस्त वीजेचा लाभ महावितरणसह सर्वच वीज कंपन्यांच्या ग्राहकांना मिळणार आहे.
महावितरणचे वीजदर (घरगुती ग्राहक)
स्थिर आकार – १३०-४३० रुपये
वहन आकार – प्रति युनिट १.२४ रुपये सर्व ग्राहकांसाठी
वीजदर प्रति युनिट रुपयांमध्ये
वीज वापर | सध्याचे दर | नवीन दर |
०-१०० | ४.७१ | ४.४३ |
१०१-३०० | १०.२९ | ९.६४ |
३०१-५०० | १४.५५ | १२.८३ |
५००हून अधिक | १६.७४ | १४.३३ |
अदानी वीज कंपनी
अदानी वीज कंपनीने ९६७९३ कोटी रुपये खर्चासाठी प्रस्ताव सादर केला होता, त्याऐवजी ८३९५८ कोटी रुपये खर्चास आयोगाने मंजुरी दिली. अदानी कंपनीचा वीजपुरवठ्याचा सध्याचा प्रति युनिट सरासरी दर १०.०६ रुपयांवरून पुढील पाच वर्षात ७.७९, ७.२४, ७.०८,७.५ व ७.५१ इतका कमी होईल.
प्रतियुनिट वीज दर रुपयांमध्ये
वीजवापर | सध्याचा दर | नवीन दर |
०-१०० | ६.४० | ६.३८ |
१०१-३०० | ९.१० | ९.६३ |
३०१-५०० | ११.१० | ११.०३ |
५०० हून अधिक | १२.४० | ११.९८ |
टाटा वीज कंपनी
टाटा वीज कंपनीने ४९६० कोटी रुपयांचा वीजदर वाढीचा प्रस्ताव सादर केला होता, त्यापैकी ४५९१ कोटी रुपये आयोगाने मंजूर केले. सरासरी वीजपुरवठ्याचा दर १८ टक्क्यांनी यंदा कमी होत असून तो प्रति युनिट ७.५६ रुपये इतका असेल व पाच वर्षात तो ६.६३ इतका कमी होईल.
घरगुती ग्राहकांसाठी प्रतियुनिट वीज दर (व्हेरिएबल)रुपयांमध्ये
वीजवापर | सध्याचा दर | नवीन दर |
०-१०० | ५.३३ | ४.७६ |
१०१-३०० | ८.५१ | ४.७६ |
३०१-५०० | १४.७७ | १३.५५ |
५०० हून अधिक | १५.७७ | १४.५५ |
बेस्टचे वीजदर
बेस्टच्या ४३९४ कोटी रुपयांच्या दरवाढीच्या प्रस्तावापैकी ४४७४कोटी रुपये वाढ आयोगाने मंजूर केली आहे. मेट्रो, रेल्वे, मोनोरेल आदी मोठा वीज वापर असणाऱ्या ग्राहकांना वहन आकार आकारला जाणार नाही.
बेस्टचे घरगुती ग्राहकांसाठी एक एप्रिलपासून प्रति युनिट दर रुपयांमध्ये
वीजवापर | सध्याचे दर | नवीन दर |
०-१०० | ३.८४ | ३.८४ |
१०१-३०० | ७.४३ | ७.४३ |
३०१-५०० | ११.५३ | ११.९१ |
५०० हून अधिक | १३.७० | १४.११ |