सावंतवाडी : महाराष्ट्रात निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून नवनवीन योजना आणल्या जात आहेत पण योजना पूर्ण करायला यांच्याकडे पैसे नसल्यानेच आता रिझर्व्ह बॅंकेकडे सव्वालाख कोटीचे कर्ज मागितले आहे. त्यामुळेच निवडणुका लवकर लागल्या पाहिजे अन्यथा महाराष्ट्रावर नऊ लाख कोटींचे कर्ज होईल आणि ते आपणास परवडणारे नाही, त्यामुळे महाराष्ट्रातील सरकार घालवा आणि सर्वसामान्यांचे सरकार आणा असे आवाहन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केले.

शिवस्वराज्य यात्रेनिमित्त शनिवारी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाची जाहीर सभा सावंतवाडीतील गांधी चौकात पार पडली. यावेळी खासदार डाॅ. अमोल कोल्हे, युवक अध्यक्ष सुनिल गव्हाणे, माजी मंत्री प्रविण भोसले, आदी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, आतापर्यंतच्या इतिहासात विद्यमान सरकारमध्ये चालला तसा भष्ट्राचार जनतेने कधीच पाहिला नव्हता. इव्हेंटचे सरकार झाले आहे. लाडकी बहीण योजना आणली, पण बहीण सुरक्षित राहिली तरच योजना चालणार पण सांगणार कोण? महिला सुरक्षा महत्त्वाची आहे. फक्त राज्यावर कर्जाचा डोंगर उभा राहात आहे, आता नव्या योजनांसाठी सव्वालाख कोटींचे कर्ज मागितले आहे. त्यामुळे निवडणुका लवकर झाल्या पाहिजेत कर्ज, घ्यायचे तरी बंद करतील, नाहीतर राज्यावर नऊ लाख कोटींचे कर्ज होईल, अशी भिती पाटील यांनी व्यक्त केली.

हेही वाचा – सुधीर मुनगंटीवार यांना डी.लिट. म्हणजे चंद्रपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

पाटील यांनी यावेळी दिपक केसरकर यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, दिवाळी आली तरी शालेय विद्यार्थ्यांना गणवेश नाही, यांना फक्त लाडका काॅन्ट्रक्टर हवा आहे. पण मुलांचे गणवेश नको. आपल्या मतदारसंघात पंधरा वर्षांपूर्वी ज्या घोषणा केल्या त्या आजही पूर्ण झाल्या नाहीत त्यामुळेच नवो आमदार हवो असे म्हणत केसरकर यांची खिल्ली उडवली, तसेच जाणीव जागर यात्रेत मिळालेल्या प्रतिसादाबद्दल घारे-परब यांचे कौतुक केले. काँग्रेस, उद्धव ठाकरे सेनेला विनंती करून सावंतवाडी मतदारसंघात बदल घडवून आणू असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला आहे.

खासदार कोल्हे यांनीही मंत्री केसरकर यांच्यावर जाकिटवाला असे जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, त्यांची अवस्था जादुगारासारखी झाली आहे, पण आता ही जादू चालणार नाही. जनताच म्हणतेय आता बदल हवो तर नवो आमदार हवो असे म्हणत केसरकरांची खिल्ली उडवली. जनतेला कळून चुकले आहे त्याच त्या घोषणा ऐकून जनता कंटाळली आहे, त्यामुळेच येथे बदल घडवण्याचे काम सावंतवाडीतील जनतेचे आहे. आमदार दमदार हवा पण गद्दार नको त्यामुळे गद्दारांना धडा शिकवा, असे आवाहनही कोल्हे यांनी केले.

हेही वाचा – “शरद पवार शेतीऐवजी मैदानावर…” शिवराजसिंह चौहान यांची टीका

डॉ अमोल कोल्हे म्हणाले, महाराष्ट्रात एक फुल्ल दोन हाफ आहेत. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सोडले त्यामुळेच मालवणमधील पुतळा पडला. या सरकारने सर्वच क्षेत्रात भ्रष्टाचार केला असून त्यातूनही महाराजांना सोडले नाही, यांचे वस्त्रहरण करण्याची वेळ आली आहे. यांना माफी नाही असे आवाहन करत यांनी पन्नास खोके घेतले आणि लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देतात, मुलांना गणवेश मिळत नाही, दोन वर्षे तोच गणवेश घालतात यावरून येथील शिक्षणमंत्र्यांनी बोध घ्यावा, हवेतील बाता करू नये. केसरकर १५ वर्षे आमदार व ७ वर्षे मंत्री आहेत. त्यांना आता आराम करू द्या, आता बदल हवो तर नवीन आमदार नवो, असे आवाहन करून अर्चना घारे यांनी परब यांच्या कामाचे कौतुक केले.