सातारा : मांढरदेव देवस्थान परिसरातील अवैध दारूविक्री विरोधात गावातील महिलांनी पंधरा दिवसांपासून आवाज उठवत ग्रामपंचायतीला दारू विक्री बंदीसाठी विशेष ग्रामसभा घेण्याची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीला प्राधान्य देऊन ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभा बोलावली. ग्रामसभेत दारूबंदी ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
ग्रामसभेस महिला, पुरुष व युवक वर्ग बहुसंख्येने हजर होते. दारूमुळे गावातील अनेक कुटुंबांतील लोकांना आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले आहे. काही नशा करणाऱ्यांची जीवितहानी झाली आहे. यामुळे अनेक कुटुंबांना वेगवेगळ्या प्रसंगांना सामोरे जावे लागले आहे. अनेकांचे आरोग्य धोक्यात असून, संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. अनेक कुटुंबांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत असल्याचे महिलांकडून निदर्शनास आणून देण्यात आले. गावामध्ये अवैध दारू विक्रीवर कायमस्वरूपी बंदी आणण्याचा ठराव महिलांकडून मांडण्यात आला. त्यावर चर्चा करून ठराव सर्व ग्रामस्थ, युवक व महिलांकडून एकमताने मंजूर करण्यात आला.
मांढरदेवचे बीट अंमलदार उद्धव लिंबे यांनी पोलीस प्रशासनाकडून संपूर्ण सहकार्य केले जाईल, असे सांगण्यात आले. यावेळी जुगार अड्डेही बंद करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.
सरपंच सीमा मांढरे, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील जयश्री मांढरे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नामदेव हिरवे, ग्रामस्थ धर्माजी मांढरे, मारुती मांढरे, शंकर मांढरे, सोपान मांढरे, श्रीकांत कोचळे, परशुराम मांढरे, शंकर मांढरे, फुलचंद मांढरे, विश्वस्त विजय मांढरे, चंद्रकांत मांढरे व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.