छत्रपती संभाजीनगर : पाऊस कमी पडल्याने ऑगस्ट अखेरीच्या दिवसात मराठवाडय़ात ८४ टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा लागतो आहे. दिवसेंदिवस टँकरची संख्या वाढू लागली असून, ४०४ विहिरी अधिग्रहित कराव्या लागल्या आहेत. यातील ४३ विहिरी टँकरने पाणीपुरवठय़ासाठी अधिग्रहित करण्यात आलेल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 मराठवाडय़ातील टंचाईचे वर्ष लक्षात घेता टँकरच्या निविदा नक्की करण्यात आल्या असून, सर्वाधिक दर छत्रपती संभाजीनगरचे आहेत. प्रतिमेट्रिक टन २४५ रुपये तर किलोमीटरचा दर ३ रुपये ३८ पैसे एवढा आहे. बीड जिल्ह्यात टँकरचा पाण्याचा दर सर्वात कमी म्हणजे ८५ रुपये एवढा ठरविण्यात आलेला आहे. २०१५ मध्ये मराठवाडय़ात पिण्याच्या पाण्यासाठी सर्वाधिक ४ हजार १५ टँकर लागले होते. २०१९ मध्ये ही संख्या ३ हजार ४०२ एवढी होती. आत ऑगस्टपासूनच टँकरने पाणीपुरवठा करावा लागत असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंगळवारी आढावा बैठकीत देण्यात आली. मराठवाडय़ातील मोठय़ा, मध्यम व लघु प्रकल्पांत मिळून ३५ टक्के पाणीसाठा आहे.

नांदेड, हिंगोली वगळता पाऊस नसल्यामुळे टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. केवळ भूपृष्ठीय पाणीसाठा आटला आहे असे नव्हे तर लातूर जिल्ह्यातील चार आणि बीड व परभणी  जिल्ह्यात प्रत्येक एक तालुक्यात भूजल पातळी कुठे एक मीटरने तर कुठे दोन मीटरने घटलेली आहे. पाऊस पडला नाही तर मराठवाडय़ातील टंचाईची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत जाईल, असे सांगितले जात आहे.  दरम्यान, टँकरचे दर आता ठरविण्यात आले असून त्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे दर अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत खूप अधिक असल्याचे सूत्रांनी सांगितले.

 मागील नऊ वर्षांत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक टँकर लागले होते. टंचाईच्या २०१५ आणि २०१९ या वर्षांत ही संख्या अनुक्रम ९३७ आणि १ हजार १४४ एवढी होती. या वर्षीही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ४१ आणि जालना जिल्ह्यात ४३ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. बीड जिल्ह्यात ७० विहिरी अधिग्रहित करून पाणीपुरवठा केला जात आहे. उस्मानाबादमधील स्थितीही फारशी बरी नाही. येथेही पिण्याच्या पाण्यासाठी ५५ खासगी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In marathwada the water tanker starts in the month of august ysh