ठाणे, मुंबई, पुणे : राज्यात मंगळवारी बहुतांश ठिकाणी तापमानाने ४० अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला. ठाण्यातील मुरबाडमध्ये सर्वाधिक ४४ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेल्या तापमानाने मंगळवारी ठाणे जिल्ह्यात नवा उच्चांक नोंदवला. जिल्ह्यातील मुरबाडमधील ४४ अंश सेल्सिअसपाठोपाठ धसई येथे ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. बदलापूर, कल्याण, डोंबिवली, मुंब्रा, ठाणे, नवी मुंबई या सर्वच शहरांत तापमान ४२ अंश सेल्सिअसच्या वर होते. त्यामुळे जिल्ह्यात उष्णतेची लाट जाणवली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाण्यातील कासारवडवली आणि कल्याण शहरात ४२.८ अंश सेल्सिअस, तर बदलापूर आणि डोंबिवली येथे ४२.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तापमानाच्या नोंदीनुसार मंगळवार हा वर्षांतील सर्वात उष्ण दिवस ठरल्याची माहिती अभिजीत मोडक यांनी दिली. मुंबईच्या किनारी तापमान ३७ अंशावर असले तरी समुद्रापासून आत शहरांमध्ये उष्ण वाऱ्यांमुळे तापमानात वाढ दिसून येते. संपूर्ण विदर्भ,  मराठवाडय़ातील बीड आणि परभणी, तसेच मध्य महाराष्ट्रात जळगाव आणि सोलापूर येथे तापमानाने चाळिशी ओलांडल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे शहरात ३९.२ एवढे तापमान नोंदवण्यात आले. राज्यात १४ ठिकाणी कमाल तापमान चाळीस अंश सेल्सिअसवर गेल्याचे दिसून आले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In most places the temperature rises 40 degree celsius ysh