नांदेड : कंधार तालुक्यातील फुलवळसह आंबूलगा, सोमासवाडी, मुंडेवाडी, कंधारेवाडी, पानशेवडी, गऊळ, जंगमवाडी, वाखरड आदी परिसरात गुरुवारी (२० मार्च) सायंकाळी अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचे आगमन झाले. या वादळ वाऱ्यामुळे गहू, हळद, उन्हाळी ज्वारी, भुईमूग, करडईसह अन्य उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे.
सध्या सर्वत्र हळद काढणे, गहू कापणे, राशी करणे ही शेतीतील कामे चालू असून कापलेल्या गव्हाचे काड उघड्यावरच असल्याने पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. पीक वाचवण्यासाठी शेतकरी, शेतमजुरांची धावपळ उडाली. शेतात असलेल्या मुक्या जनावरांचेही मोठे हाल झाले.
उमरी तालुक्यात वादळी वारे व विजेच्या कडकडाटासह हलका पाऊस सुरू झाला आहे. शंकरनगर परिसरातही विजांच्या कडकडात दमदार पाऊस झाला.