नांदेड : कृषी अधिकारी कार्यालयातून शेतक-यांना दिल्या जाणा-या सूक्ष्म सिंचन योजनेतून काही अधिकारी व कर्मचा-यांनी गैरप्रकार केल्याचे उघडकीस आल्यानंतर गुरुवारी नांदेडच्या सिडको पोलीस ठाण्यात १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. या प्रकरणात ६ कोटी रुपयाचा अपहार झाल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे एकाही आरोपीला अटक करण्यात आली नाही.

कृषी अधिकारी कार्यालयातून शेतक-यांना वेगवेगळ्या योजनांचा लाभ दिला जाताे. यात ठिबक व तुषार सिंचन संचाची योजना आहे. नांदेड येथील कृषी अधिकारी कार्यालयातून २०२१ ते २३ मध्ये या योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाला. वितरकांसोबत खोटा दस्तावेज तयार करून तो ख-या असल्याचे शासनाला भासवत ५ कोटी ९८ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले. अर्थसंकल्पीय अधिवेशनात काही लोकप्रतिनिधींनी तारांकित प्रश्नांद्वारे हे प्रकरण समोर आल्यानंतर नांदेड जिल्ह्यातील कृषी कार्यालयातील तंत्र अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक एस. एम. स्वामी यांनी दिलेल्या तक्रारीवरून तत्कालीन कृषी पर्यवेक्षक आर. के. मरदोडे, कृषी अधिकारी एच. डी. बनसोडे (धर्माबाद), कृषी पर्यवेक्षक एस. व्ही. दबडे, तालुका कृषी अधिकारी पाटणकर, जे. डी. पवार, एस. एच. कंचकलवार (मुखेड), श्रीमती आर. बी. पवार (लोहा) , कृषी पर्यवेक्षक आर. बी. जाधव (पुर्णा, जि.हिंगोली), एस. बी. बैस, कृषी अधिकारी आर. जे. चव्हाण, तालुका कृषी अधिकारी एच. पी. नव्हारे, मुखेडच्या ज्ञानेश्वर कृषी सेवा केंद्राचे ज्ञानेश्वर गुट्टे यांच्यासह १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

फसवणूक करणे, अपहार करणे, बनावट कागदपत्रे तयार करणे यासह वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर हे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरीही अद्याप एकाही आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले नाही. घटनेनंतर बहुतांश आरोपी फरार झाले असून त्यांच्या अटकेसाठी सिडको पोलीस स्टेशनचे पथक प्रयत्नरत असल्याचे सांगण्यात आले.