नांदेड : १९६०च्या दशकात आशय आणि अभिव्यक्तीच्या वेगळेपणातून ‘दलित साहित्य’ जोरकसपणे पुढे आले. या साहित्य प्रवाहाने जागतिक साहित्याला समृद्ध केले. पण सन २०००पर्यंत येता-येता दलित साहित्य मंदावले. या कारणांचा वेगवेगळ्या अंगाने शोध घ्यायला हवा. कोणत्याही साहित्य प्रवाहाची समृद्धी सामूहिक प्रयत्नाने होते. त्यामुळे दलित साहित्याचे मंदावलेपण सामूहिक प्रयत्नाने भेदावे लागेल, असे प्रतिपादन प्रख्यात नाटककार आणि विचारवंत प्रा. दत्ता भगत यांनी केले.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्राच्या वतीने ‘दलित साहित्य: जागतिक परिप्रेक्ष्य’ या विषयावर आयोजित एक दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर हे होते. यावेळी बीजभाषक डॉ. शैलेंद्र लेंडे (नागपूर), व्यवस्थापन परिषद सदस्य नरेंद्र चव्हाण, अध्यासन केंद्राचे संचालक आणि कार्यक्रमाचे संयोजक डॉ. पी. विठ्ठल, अली नासिर मोहम्मद अलुमिन (येमेन) यांची प्रमुख उपस्थिती होती.

बीजभाषक करताना डॉ. शैलेंद्र लेंडे म्हणाले, दलित साहित्याचा वैचारिक गाभा हा आंबेडकरवादी तत्त्वज्ञानाचा राहिला आहे आणि या आंबेडकरवादी तत्त्वज्ञानाच्या बळावर हे साहित्य विश्वजाणिवेचे साहित्य ठरले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तित्व व कर्तृत्व वैश्विक दृष्टिकोनातून आकारास आलेले असल्यामुळे त्यांच्या विचारावर पोहचले गेलेले दलित साहित्य हे देखील वैश्विक दृष्टिकोनाचे साहित्य ठरले आहे. दलित साहित्याचा जागतिक परिप्रेक्षातून विचार केल्यास हे साहित्य जागतिक मूल्यव्यवस्था अभिव्यक्त करणारे साहित्य ठरते, त्याचप्रमाणे ते जागतिक साहित्याला समृद्ध करणारे साहित्य ठरते.

विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मनोहर चासकर यांनी या चर्चासत्राच्या आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. तर नरेंद्र चव्हाण यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. या चर्चासत्रात सतपाल भिकी (पटियाला-पंजाब), दर्भसायनाम श्रीनिवासाचार्य (हैदराबाद), डॉ. रमा नवले (नांदेड), डॉ. संजय कांबळे (बेळगाव), डॉ. रफिक सूरज (कोल्हापूर), गौतम वेगडा (गुजरात) यांनी वेगवेगळ्या विषयांवर दलित साहित्याच्या संदर्भात चर्चा केली. डॉ. स्मिता पाटील (पुणे), डॉ. योगिनी सातारकर, डॉ. वैजनाथ अनमुलवाड, डॉ. शंकर विभुते यांनी समांतर सत्रांचे अध्यक्षपद भूषविले.

या चर्चासत्रात देश- विदेशातील सुमारे शंभर संशोधकांनी आपले शोधनिबंध वाचन केले. प्रारंभी चर्चासत्राचे प्रास्ताविक डॉ. पी. विठ्ठल यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. राजेंद्र गोणारकर यांनी तर आभार डॉ. वैजनाथ अनमुलवाड यांनी मानले.