दीपक महाले
जळगाव : विधवांना समाजात सन्मानाने जगता यावे म्हणून पूर्वापार चालत आलेल्या प्रथा-परंपरा, चालीरीतींना फाटा देण्यासाठी समाजातील विविध घटक आता पुढे येऊ लागले आहेत. नाभिक समाजानेही त्यासाठी पुढाकार घेतला असून विधवा प्रथेवर बंदी घालण्याचा निर्णय नुकताच नंदुरबार जिल्हा नाभिक समाज हितवर्धक आणि कर्मचारी संस्थेच्या त्रैमासिक बैठकीत घेण्यात आला.
विधवांच्या समस्यांची जाणीव आता सर्वांनाच होऊ लागली आहे. विधवांनाही सन्मानाने जगण्याचा हक्क आहे, हे समाजाला पटू लागले आहे. पतीच्या निधनानंतर पांढरे कपाळ घेऊन जगताना पावलोपावली होणारी मानहानी विधवांसाठी वेदनादायी असते. मंगलकार्यांत विधवेने येणे अमंगल समजले जाणे, यांसारख्या अमानवी प्रथा, परंपरा, चालीरीतींमुळे त्यांना समाजात जगणे कठीण होते. म्हणूनच नंदुरबार जिल्हा नाभिक समाज हितवर्धक आणि कर्मचारी संस्थेने केलेला ठराव महत्त्वूपूर्ण ठरतो.
विधवांनी कपाळावर टिकली लावावी, चांगली साडी नेसावी, कोणत्याही मंगलमय कार्यक्रमात त्यांना सहभागी करून घ्यावे, असे अनेक निर्णय संस्थेने घेतले. संस्थेने केवळ विधवासंदर्भातच नव्हे तर, समाजाच्या प्रगतीत अडथळा ठरणाऱ्या इतरही चालीरीतींना तिलांजली देण्याचा ठराव मंजूर केला. संस्था केवळ ठराव करून थांबली नाही, तर त्यांच्या अंमलबजावणीसाठी संस्थेचे अध्यक्ष पंकज भदाणे, उपाध्यक्ष हिमांशू बोरसे, गजेंद्र जाधव, सचिव अरविंद निकम, सहसचिव शिवाजी मिस्तरी, कोषाध्यक्ष छगन भदाणे (खापर) आदींसह समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते त्याविषयी जनजागृतीही करीत आहेत. युवावर्गाचा त्यांना सर्वाधिक सक्रिय पाठिंबा मिळत आहे.
आजच्या धावपळीच्या जीवनात लग्नकार्यात लग्नघरची मंडळी घरोघरी जाऊन लग्नपत्रिका वाटप करीत असतात. त्यात वेळ आणि पैशांचा अपव्यय होतो. वेळ कमी आणि असंख्य निमंत्रणे द्यावयाची असल्याने दमछाक होते. त्यामुळेच हे सर्व टाळण्यासाठी समाज माध्यमांचा उपयोग करण्याचेही संस्थेने ठरविले आहे. व्हॉट्सॲप, फेसबुक किंवा भ्रमणध्वनीवरून घरच्या कार्याचे आमंत्रण देण्याचा निर्णय घेण्यात आला. संस्थेमार्फत व्हॉट्सॲपवरील आमंत्रण ग्राह्य धरण्याचा ठराव करण्यात आला आहे. संस्थेने घेतलेल्या या निर्णयांना समाजातील इतर घटकांकडूनही पाठिंबा मिळावा, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
खेड्यापाड्यांत जनजागृती मोहीम
बदल स्वीकारणे प्रारंभी ज्येष्ठ मंडळींना अवघड जाणार आहे. त्यामुळे त्यांचे मन वळविण्यासाठी आणि अनिष्ठ चालीरीतींमुळे महिलांना होत असलेला त्रास त्यांच्या लक्षात आणून देण्यासाठी खेड्यापाड्यांत जनजागृतीही सुरू करण्यात आली आहे. समाजबांधवांचा त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, असे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
पूर्वापार चालत आलेल्या रूढी-परंपरा ग्रामीण भागात अजूनही पाळल्या जातात. सध्याच्या माहिती-तंत्रज्ञान युगात त्या कालबाह्य ठरतात. काही प्रथा-परंपरा महिलांसाठी अन्यायकारक आहेत. त्यामुळे त्या बंद करून विधवा महिलांनाही समाजात सन्मानाने जगता यावे, हा संस्थेचा हेतू आहे. – पंकज भदाणे, अध्यक्ष, जिल्हा नाभिक समाज हितवर्धक व कर्मचारी संस्था, नंदुरबार