नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीमधे काहीसा विसंवाद असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. कारण, अगोदर सविस्तर चर्चा होऊनही शेवटी काँग्रेसच्या उमेदवारीचा गोंधळ झालाच. यावरून महाविकास आघाडीमधील अन्य प्रमुख पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली आहे. नाशिक मतदारसंघात काँग्रेस नेते सुधीर तांबे आणि त्यांचे पुत्र सत्यजीत तांबे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर महाविकासआघाडीचा उमेदवार कोण असा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर शिवसेनेने पाठिंबा दर्शवलेल्या शुभांगी पाटील या महाविकास आघाडीच्या उमेदवार असल्याचं शेवटच्या क्षणी जाहीर करण्यात आलं. या सगळ्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मित्र पक्षांना सूचक इशारा दिल्याचं दिसून आलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नक्की वाचा – “केशवराव हे फालतूचे धंदे बंद करा, असेच खोटे बोलत राहिलात तर…” संजय राऊतांचा केशव उपाध्येंना प्रत्युत्तर!

संजय राऊत म्हणाले, “शुभांगी पाटील ज्या उमेदवार आहेत, त्या काल भेटल्या आणि त्यांनी शिवसेनेचा पाठिंबा उद्धव ठाकरे यांच्याकडे मागितला व आम्ही त्यांना पाठिंबा दिला, कारण त्यांची तयारी आम्ही पाहिली आणि आम्हाला असं वाटलं की त्या लढतीमध्ये चांगल्याप्रकारे पुढे जाऊ शकतात. यासंदर्भात आम्ही काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना सूचना केली आहे आणि त्या योग्य उमेदवार आहेत. या पार्श्वभूमवीर आज उद्धव ठाकरे यांनी उत्तर महाराष्ट्रातील सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना त्याबाबत सूचना दिलेल्या आहेत, की आपल्याला शुभांगी पाटील यांच्या मागे उभा राहायचं आहे.”

हेही वाचा –“मग “अयोध्या दि ट्रॅप’ चित्रपटाच्या कथेचा रचेता कोण होता बरं? का ते पण नेहमीप्रमाणे…” सचिन सावंतांचा बाळा नांदगावकरांना टोला!

याचबरोबर, “एकत्र बसून नक्कीच सुरुवातीला चर्चा झाली होती. त्यानुसार नागपूर शिवसेनेसाठी सोडलं होतं. पण शेवटी प्रत्येकवेळी त्याग करण्याची जबाबदारी ही शिवसेनेवरच असते आणि विरोधकांचं ऐक्य वैगेरे या महान शब्दांना महत्त्व देऊन आम्ही हा त्याग करत आलो. पण यापुढे असं होणार नाही. यापुढे आम्ही आमच्या भूमिका ठरवू.” अशा शब्दांत संजय राऊतांनी यावेळी मित्रपक्षांना सूचक इशारा दिल्याचे दिसून आले.

… त्यामुळे आम्ही ती उमेदवारी मागे घेतली –

याशिवाय, “नागपूर शिक्षक मतदारसंघ जो आहे, तिथे शिवसेनेचे उमेदवार होते त्यांची उमेवदवारी आम्ही मागे घ्यायला सांगितली. कारण, महाविकास आघाडीच्या संदर्भात जर निर्णय घ्यायचा असेल तर सगळ्यांनी एकत्रित लढलं पाहिजे. त्यामुळे आम्ही ती उमेदवारी मागे घेतली आणि आडबोले म्हणून जे उमेदवार आहेत, त्यांच्या मागे उभा राहण्याचा निर्णय घेतला. या संदर्भात आज सकाळी नाना पटोले व उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली. त्यातून हे सगळे निर्णय़ आम्ही घेतले.” असंही संजय राऊतांनी सांगितलं.

अशाप्रकारचे घोळ आणि गोंधळ होता कामानये –

“या निवडणुकीच्या निमित्ताने महाविकासआघाडीच्या उमेदवाराबाबत काही निर्णयाबाबत एक विस्कळीतपणा स्पष्टपणे दिसला. काही निर्णयांबाबत. या पुढील निवडणुकीत आपण अधिक काळजीपूर्वक पावलं टाकली पाहिजे. अशाप्रकारचे घोळ आणि गोंधळ होता कामानये हा धडा या निवडणुकीतून महाविकास आघाडीतील प्रत्येक घटक पक्षाने घेतला पाहिजे.” असं म्हणत संजय राऊतांनी महाविकास आघाडीतील विसंवाद एकप्रकारे दर्शवला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nashik graduate constituency elections disturbance was observed regarding the candidate of mahavikas aghadi sanjay raut msr