वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नीट परीक्षेत गैरव्यवहार झाल्याचे समोर आल्यानंतर देशभरात खळबळ माजली. बिहारमधून परीक्षेच्या प्रक्रियेत हस्तक्षेप करत पेपरफुटी प्रकरण घडले, असल्याचा आरोप ठेवण्यात आला. पण बिहार हे एकमात्र राज्य नाही जिथे गैरकारभार झाला. आता पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्रातून दोन शिक्षकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
नांदेडच्या दहशतवादी विरोधी पथकाने नीटच्या पेपरफुटी प्रकरणात लातूरमधून दोन शिक्षकांना अटक केली आहे. बिहारमधून १३ लोकांना अटक करण्यात आल्यानंतर महाराष्ट्रातूनही दोन लोकांना ताब्यात घेतल्यामुळे पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्राचे कनेक्शन आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. संजय तुकाराम जाधव आणि जलील उमरखाँ पठाण या दोन जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना नांदेड एटीएसकडून ताब्यात घेण्यात आले आहे. यापैकी एक शिक्षक लातूरमध्ये तर दुसरा सोलापूरमध्ये कार्यरत आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात आता दोघांचीही कसून चौकशी केली जात आहे.
विश्लेषण: ‘नीट’ गोंधळाचे परिणाम काय?
शनिवारी रात्री दोघांनाही लातूरमधून ताब्यात घेतल्यानंतर चौकशी करून त्यांना सोडण्यात आले. मात्र पुन्हा चौकशी करण्याची गरज भासल्यास बोलावले जाईल, अशी ताकीद त्यांना देण्यात आली आहे. विशेष म्हणजे दोन्ही शिक्षक लातूर जिल्ह्यात खासगी शिकवणी वर्ग चालवतात.
वैद्याकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरिता घेण्यात आलेल्या ‘नीट-यूजी’ २०२४ सामाईक प्रवेश परीक्षेच्या निकालावरून देशभर वादाचे लोण पसरले आहे. काही पालकांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये जनहित याचिकाही दाखल केली आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स), केंद्रीय विद्यापीठांसह शासकीय वैद्याकीय महाविद्यालय तसेच अभिमत विद्यापीठांमध्ये एमबीबीएस, बीडीएस आणि बीएस्सी नर्सिंग या अभ्यासक्रमातील प्रवेशासाठी ‘नीट’ची परीक्षा घेण्यात येते. यात देशभरातून सुमारे २४ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ५ लाख ४७ हजार ३६ विद्यार्थी आणि ७ लाख ६९ हजार २२२ विद्यार्थिनी वैद्याकीय प्रवेशासाठी पात्र ठरल्या आहेत.
कधी ‘नीट’ तर कधी ‘नेट’: परीक्षांमध्ये नेमका काय गोंधळ झालाय?
यंदा पात्र ठरणाऱ्यांच्या संख्येत तब्बल दोन लाखांनी वाढ झाली आहे. त्यामुळे ‘पात्रता गुणां’मध्ये (कट ऑफ) प्रचंड वाढ झाली. उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न भंगले आहे. देशात वैद्याकीय अभ्यासक्रमाच्या उपलब्ध जागांच्या तुलनेत ६०० गुणांच्या वर उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्याच एक लाखाच्या घरात असल्याने अनेक विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला आहे.