शिवाजी पार्क मैदानावर आज महाविकास आघाडीच्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. सर्वप्रथम शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली. त्यांच्यापाठोपाठ एकनाथ शिंदे, सुभाष देसाई यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीकडून प्रदेशाध्यक्ष आणि विधिमंडळ पक्षाचे नेते जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
यावेळी छगन भुजबळ यांनी शपथ घेण्याआधी जय महाराष्ट्र, जय शिवराय असा नारा दिला. त्यानंतर पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा उल्लेख करण्याआधी छगन भुजबळ यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मरण केले. त्यानंतर त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. छगन भुजबळ यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात शिवसेनेमधून झाली आहे. शिवसेनेकडून त्यांनी नगरसेवक, महापौर, आमदार अशी वेगवेगळी पदे भूषवली.
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू सहकारी अशी छगन भुजबळ यांची एकेकाळी ओळख होती. पण शिवसेनेमध्ये मतभेद निर्माण झाल्यानंतर त्यांनी शरद पवारांचे नेतृत्व स्वीकारले. त्यांनी आधी काँग्रेसमध्ये नंतर शरद पवारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीमध्ये असताना त्यांनी उपमुख्यमंत्रिपदासह वेगवेगळी मंत्रिपदे भूषवली. विधानसभा निवडणुकीआधी छगन भुजबळ शिवसेनेमध्ये प्रवेश करणार अशी जोरदार चर्चा होती. पण त्यांनी राष्ट्रवादीची साथ सोडली नाही. पक्षातील त्यांचे ज्येष्ठत्व, अनुभव लक्षात घेता त्यांना पक्षाने पुन्हा एकदा मंत्रिपदावर संधी देण्यात आली आहे.