मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजलेला असतानाच ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष निर्माण झाला आहे. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यास ओबीसी नेत्यांनी विरोध केला आहे. तर, मराठा समाजाने आरक्षण मिळवूनच दाखवणार असा प्रण घेतला आहे. त्यामुळे राज्यात नवा संघर्ष पाहायला मिळतोय. यावरून, मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी नेते आणि राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांचं नाव न घेता टीका केली आहे. काल (२० नोव्हेंबर) ते कल्याणला आले होते. यावेळी त्यांनी टीका केली.
छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात आरक्षणावरून धुमश्चक्री सुरू आहे. प्रत्येक सभेत जरांगे पाटील भुजबळांना लक्ष्य करतात. तर, भुजबळही त्यांच्या प्रत्येक टीकेला चोख प्रत्युत्तर देत आहेत. आता जरांगे यांनी छगन भुजबळांच्या वयाचाच मुद्दा काढला आहे.
हेही वाचा >> मनोज जरांगे पाटील यांची गर्जना, “ज्यांनी आमचं आरक्षण खाल्लं अशा बोगस लोकांची…”
जरांगे पाटील छगन भुजबळांचा नामोल्लेख टाळत म्हणाले की, म्हातारपणात काहीच सुचेना झालंय. आपण त्याचं नाव घेत नाही. आपण कोणाचं नाव घेतलंही नाही आणि घेणारही नाही. कारण त्यांची ती लायकी राहिलेली नाही. मुंबईत तो काय करतो ते माहितेय. कोणते पाहुणे आलेत राहायला. कोणत्या पिक्चरमध्ये काम केलं. मला त्याच्याबद्दल सगळं माहितेय. आरक्षणाची २४ तारीख जवळ येतेय. मराठ्यांच्या विजयाचा तो सुवर्णक्षण आहे. मराठ्यांच्या लेकरांना आयुष्याची भाकरी मिळणार आहे, म्हणून मी शांत आहे.
आमचं बोगस आरक्षण घेतलं
तसंच, मराठा कुणबी आणि कुणबी मराठा याचे ३० लाख पुरावे मिळाल्याची माहिती ही आम्हाला मीडियाकडूनच मिळाली आहे, माझ्याकडे याबाबत अधिकृत माहिती आलेली नाही. जर अशी माहिती आली तर मी जाहीर करेन असं मनोज जरांगे पाटील यांनी कल्याणमध्ये जाहीर केलं आहे. ज्यांनी आमचं बोगस आरक्षण घेतलं आहे, त्यांची संपत्तीही जप्त झाली पाहिजे, असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. २५ डिसेंबरला आम्ही काय करणार ते इतक्यात सांगणार नाही, तो आमचा गनिमी कावा असणार आहे, असंही जरांगे पाटील म्हणाले आहेत.