परभणी : विविध धार्मीक, राजकीय मुद्यांवरून सोशल मिडीयावर वादग्रस्त पोस्ट, कमेंट करणाऱ्यांना पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावून तंबी देण्यात आली आहे. सोशल मिडीयाचा गैरवापर करणाऱ्यांविरुद्ध चार गुन्हे दाखल करण्यात आले असून २१ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई तर ५७ जणांना नोटीसा बजावण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्री. रविंद्रसिंह परदेशी यांनी दिली आहे.
नागपूर येथील घटनेनंतर समाज माध्यमांवर काही आक्षेपार्ह प्रतिक्रिया उमटत आहेत.सामाजिक सलोख्यावर त्याचा परिणाम होत आहे. याप्रकरणी खबरदारी घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. रविंद्रसिंह परदेशी यांनी परभणी जिल्ह्यात सायबर पोलीस ठाण्यासह सर्व पोलीस ठाण्यांमध्ये सोशल मिडीया मॉनीटरींग सेलची स्थापना केली आहे. त्यावरून सर्व पोलीस ठाण्यांसह सायबर पोलीस ठाण्याच्या सोशल मिडीया सेलचे अंंमलदार सतत अशा वादग्रस्त पोस्ट करणाऱ्यांच्या शोधात आहेत. त्याकरिता विविध टुल्स व हॅश टॅगचा वापर करण्यात येत आहे. सायबर पोलिसांचा सोशल मीडिया सेल सतर्क राहून वादग्रस्त पोस्टवर लक्ष देत असून धार्मीक व राजकीय मुद्द्यांवरून सोशल मीडियावर केलेल्या वादग्रस्त पोस्टवर पोलिस बारकाईने लक्ष ठेवून आहेत. अशा पोस्ट करणाऱ्या प्रोफाइलची माहिती मिळूवन ती पोस्ट डिलिट करण्यासाठी प्रक्रिया पोलिस पार पाडत आहेत.
गंभीर प्रकरणांत वादग्रस्त पोस्ट, कमेंट करणाऱ्यांवर ४ गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच २१ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली असून ५७ जणांना नोटीस देण्यात आलेल्या आहेत. सोशल मीडियावर कुठलेही पेज, वैयक्तिक खात्यांवर वादग्रस्त, आक्षेपार्ह पोस्ट, कमेंट आढळून आल्यास ७७४५८५२२२२ या पोलीस नियंत्रण कक्षाचे व्हॉटसअॅपवर लिंक, स्क्रीन शॉट पाठवावे. इतरत्र कुठेही सदर पोस्ट शेअर करू नये. ती लाईक करू नये अथवा त्यावर कसलीही कमेंट करू नये, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्री. रविंद्रसिंह परदेशी यांनी केले आहे.
या कलमान्वये दाखल होऊ शकतो गुन्हा
बीएनएस २९९ : कोणत्याही वर्गाच्या धर्माचा किंवा धार्मिक श्रद्धांचा दुष्ट उद्देशाने अपमान करणे.३ वर्षांपर्यंत कारावास, दंड, किंवा दोन्ही. बीएनएस ३५२ : कोणत्याही व्यक्तीचा जाणीवपूर्वक अपमान करून चिथावणी देणे, ज्यातून सार्वजनिक शांतता भंग होण्याची शक्यता असते. शिक्षा : दोन वर्षांपर्यंत कारावास, दंड, किंवा दोन्ही अशी माहिती पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.