परभणी : जायकवाडी प्रकल्पातून सोडलेल्या पाण्याचा पूर्ण क्षमतेने विसर्ग होत नसल्यामुळे शेतकर्‍यांची पीके वाळून जात असून तात्काळ पूर्ण क्षमतेने पाणी सोडले जावे या मागणीसाठी येथे उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्यावतीने खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी जायकवाडी पाटबंधारे प्रकल्पाच्या कार्यालयाला आज सोमवारी (दि.१७) टाळे ठोकले. यावेळी आंदोलकांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

सध्या जायकवाडी प्रकल्पातून शेतीला पाणी सोडले जात असले तरी या पाण्याचा विसर्ग जास्त क्षमतेने होत नाही. यामागे अधिकार्‍यांवर कुठला तरी राजकीय दबाव असला पाहिजे असा आरोप करत खासदार जाधव यांनी जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाला कुलूप ठोकणार असल्याचा इशारा काल दिला होता. त्यानुसार आज सर्व शिवसैनिक मोठ्या संख्येने जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयावर जमा झाले. यावर्षी जायकवाडी प्रकल्पातून उन्हाळी हंगामासाठी पाणी सोडले गेले पण पूर्ण दाबाने हे पाणी ‘टेल’पर्यंत पोहचलेच नाही. त्यामुळे रब्बीच्या पिकात घट आली आहे असा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला.

सध्या अजूनही शेतात ऊसासह अन्य पीके आहेत आणि पुरेसे पाणी नसल्याने ती वाळून जात आहेत. या प्रश्नावर सातत्याने प्रशासनाच्या कानावर घालूनही कोणत्याही उपाययोजना झाल्या नाहीत. त्यामुळे आज खासदार जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी टाळे ठोकले. यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आनेराव, बाजार समितीचे सभापती पंढरीनाथ घुले, काशिनाथ काळबांडे यांच्यासह शेतकरी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Story img Loader