परभणी : ‘मरावे परी किर्ती रूपे उरावे’असे म्हणतात. जगाचा निरोप घेतल्यानंतरही अवयवदानाच्या प्रक्रियेत एका युवकाचे डोळे, दोन किडनी, हृदय, फुफ्फुस असे अवयव पाच गरजू रुग्णांच्या कामी आले. दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या युवकास रूग्णालयात नेले असता मेंदुमृत झाल्याचे निदान झाल्यानंतर कुटुंबियांनी त्याच्या अवयवदानास संमती दिली. येथील देवगिरी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पूर्ण करण्यात आली. परभणीत झालेले हे दुसरे अवयवदान आहे.

जिंतूर तालुक्यातील चिंचोली दराडे येथील दीपक विलासराव दराडे (वय २६ वर्षे) यास शनिवारी संंध्याकाळी जिंतूर-औंढा महामार्गांवर एका पेट्रोलपंपाजवळून स्वतःच्या शेतातून पायी घरी जात असताना एका दुचाकीने जोराची धडक दिली. मात्र या अपघातात त्याच्या शरिरावर कुठलीही जखम नव्हती. आपल्याला काहीच झालेले नाही असे समजून तो रात्री घरी जाऊन झोपला. दुसर्‍या दिवशी सकाळी तो झोपेतून उठत नसल्यामुळे नातेवाईकांनी त्याला परभणी येथे देवगिरी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले. त्याठिकाणी डॉ.एकनाथ गबाळे यांनी तपासणी करून अपघातात डोक्याअंतर्गत रक्तस्त्राव होऊन तो मेंदूमृत (ब्रेनडेड) झाल्याचे सांगितले. अशा स्थितीत रूग्णाचे अवयव दान करता येतात, अशी माहितीही त्यांनी नातेवाईकांना दिली.

त्यानंतर दीपकचे वडील विलास श्रीपतराव दराडे, आई कुसुम विलास दराडे, भाऊ राजू दराडे, माधव दराडे व मामा अ‍ॅड. भगवानराव घुगे व गणेशराव घुगे यांनी परभणी येथील देवगिरी रुग्णालयाचे संचालक डॉ. एकनाथ गबाळे व डॉ. अतुल जाधव यांच्याशी सविस्तर चर्चा केली आणि दीपकच्या अवयवदानास संंमती दिली. दरम्यान डॉ.गबाळे यांनी राज्यस्तरीय अवयवदान समन्वय समितीला ही माहिती कळवली. त्यानुसार पुर्वी नोंदणी केलेल्या रूग्णांच्या गरजेनुसार पाचही अवयव दीपकच्या शरिरातून काढून त्या त्या शहरांमध्ये तातडीने ग्रीन कॉरिडॉर तयार करून पाठवण्यात आले. तसेच चार तासाच्या आत त्या पाचही अवयवांंचे गरजूंच्या शरिरात प्रत्यारोपण करण्यात आले.अशी माहिती अवयवदान समन्वयक विनोद डावरे यांनी दिली

Story img Loader